निलिमा चव्हाण हिच्या मृत्युचे गुढ लवकरच उलगडणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेली निलीमा हि २९ जुलैपासून बेपत्ता झाली होती. दापोली येथून चिपळूण तालुक्यातील ओमळी या आपल्या गावी जाते असे सांगून ती निघाली होती. मात्र तिचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र नंतर नातेवाईकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला. नीलिमा ही खेड – चिपळूण या एसटी. बसमध्ये बसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आले आहे. यावेळी ती एका जोडप्याला भेटल्याचे दिसत आहे. यातील तरुणाची पोलिसांनी चौकशी केली असून या तरुणाची पत्नी ही नीलिमाची मैत्रीण असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली असून त्यांना दोन मिनिटे भेटून ती पुढे प्रवासाला गेली. त्यामुळे, तूर्तासतरी या तरुणाचा या प्रकरणामध्ये कोणताही संबंध दिसत नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
चिपळूणचे आमदार भास्कर जाधव यांनीही हा विषय पावसाळी अधिवेशनात सभागृहात मांडला आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांच्या विविध यंत्रणांची पथके तपास करत आहेत. शनिवारी दोन दिवस सुट्टी असेल तेव्हा ती नेहमी आपल्या गावी जात असे. शुक्रवारी रात्री. ८ च्या दरम्यान तिने आपला भाऊ अक्षय याला कॉल करून मी सकाळी गावी येणार आहे, असेही कळवले होते परंतु तिचे हेच शब्द घरच्यांसाठी अखेरचे ठरले. ती घरी परतलीच नाही. तिचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे तिचा नेमका मृत्यू कशामुळे झाला आहे. याचे सत्य समोर येणार आहे.
जगबुडी नदीत कसून शोध – शनिवारी सकाळपासून उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुणगेकर, पोलीस निरीक्षक नितीन भोयार, दापोलीचे पोलीस निरीक्षक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची दोन पथके आणि गणेश विसर्जन कट्टा मधील एक टीम अशा तीन पथकांच्या मदतीने जगबुडी नदीत बोटीच्या मदतीने भरणेपासून अंजनीपर्यंत निलीमाच्या बॅगचा शोध घेतला जात आहे. ही बॅग नदीतून वाहत आल्याने ती सापडल्यास इतर गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बॅगेच्या शोधासाठी कोस्टगार्डच्या एका टीमची देखील मदत घेतली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.