जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे सलग २२ तास पुराच्या पाण्यात अडकलेल्या मुख्य बाजारपेठेसह तीनबत्ती नाका परिसरातील ३७५ दुकानांची हानी झाली आहे. दहा दिवसांचा कालावधी झाला तरीही बाजारपेठेतील व्यवहार कोलमडलेलेच होते. सोमवारपासून मुख्य बाजारपेठ हळूहळू सावरू लागली असून ग्राहकांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र, काही दुकानांची मोठी नासधूस झाल्याने व्यापारी दुकानांची नव्याने उभारणी करण्यात गुंतले आहेत. सलग दोन दिवस थैमान घालत जगबुडी नदीला आलेल्या पुराचे पाणी दुकानांमध्ये घुसून व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे. महसूलने दोन दिवसांतच ८ पथकांमार्फत नुकसानग्रस्त दुकानांचे पंचनामेही केले. मात्र अद्याप नुकसानीचा आकडा समोर आलेला नाही.
पुराच्या पाण्यात नदीकाठची ६८ घरेदेखील बाधित होवून मोठी हानी झाली आहे. या बाधित घरांचेदेखील पंचनामे करण्यात आले आहेत. मटण-मच्छी मार्केट, सफा मशिदा चौक, गुजरआळी, निवाचातळ, वाल्कीगल्ली, पानगल्लीसह मुख्य बाजारपेठेत जगबुडीच्या पुराचे पाणी घुसले होते. दुकानांसह साहित्यांची मोठी नासधूस झाली. पूरस्थिती ओसरल्यानंतर व्यापाऱ्यांनी तातडीने दुकानांची स्वच्छता मोहीम हाती घेतली. मात्र, सलग २२ तास दुकाने पुराच्या पाण्यात अडकल्याने व्यावसायिकांना मोठा तडाखा बसला आहे. काही व्यापाऱ्यांनी तातडीने दुकानांची नव्याने उभारणी केली तर काही व्यापारी अजूनही दुकानांची उभारणी करण्यातच गुंतले आहेत. आठवडाभर पावसाचा जोर देखील कायम होता.
सलग तीन वेळा जगबुडीने धोक्याची पातळीदेखील ओलांडली होती. यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानांमध्ये साहित्यांची मांडणी न करणेच पसंत केले होते. पूरग्रस्त भागातील केवळ मोजकीच दुकाने खुली होती. यामुळे मुख्य बाजारपेठेत तुरळकच वर्दळ दिसून येत होती. दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. यामुळे रविवारी अनेक व्यापाऱ्यांनी दुकानांमध्ये साहित्यांची मांडणी केली. सोमवारपासून बाजारपेठेतील कोलमडलेले व्यवहार काही अंशी सुरू झाले आहेत. यामुळे हळूहळू बाजारपेठही ग्राहकांनी गजबजू लागली आहे.