कणकवली तालुक्यातील हळवल फाट्यावर एका निनावी फलकामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मतदारांना पैशांचे वाटप झाल्याचा दावा करणाऱ्या या फलकामुळे निवडणुकीच्या काळात नवा वाद निर्माण झाला असून, ग्रामीण आणि शहरी मतदारांमधील भेदभावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
थंडीत राजकीय गरमागरमी आणि निनावी फलक – कणकवली तालुक्यात थंडीचा कडाका जाणवत असला तरी, हळवल फाट्यावर लागलेल्या एका वादग्रस्त फलकामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, रातोरात लागलेल्या या निनावी बॅनरने नेत्यांची झोप उडवली आहे. समान मत, समान किंमत..! असा मथळा असलेल्या या फलकावरून सध्या नाक्यानाक्यावर जोरदार ‘मालवणी गजाली’ रंगल्या आहेत. शहरात १५ हजारांची रसद पोहोचल्याचा दावा यातून करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.
१५ हजारांचा आकडा आणि मतदारांचा संताप – हा विषय गंभीर असून थेट यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. वर्दळीच्या हळवल फाट्यावर अंधाराचा फायदा घेत लावलेला हा फलक पाहून सकाळी कामावर जाणारे नोकर वर्ग आणि आणि इतर लोक अवाक झाले. शहरातील मतदारांना १५ हजार रुपये देणाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय करू नये, असा स्पष्ट मजकूर आणि १५ हजारांचा आकडा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकशाहीत प्रत्येक मताची किंमत समान असते, पण इथे मतांचा थेट बाजारभाव मांडल्याने संताप व्यक्त होत आहे.
शहरात पाकिटं आणि गावात फक्त ‘झेंडे – या फलकामुळे शहरात आणि ग्रामीण भागात होणाऱ्या भेदभावाची चर्चा सुरू झाली आहे. जर शहरातील सोसायट्यांमध्ये रात्रीतून पाकिटं पोहोचत असतील, तर ग्रामीण भागातील लोकांचा काय गुन्हा? आम्ही काय फक्त उन्हातान्हात झेंडेच नाचवायचे काय? असा तिखट सवाल गावच्या पारावर विचारला जात आहे. संविधानाने मताचा अधिकार समान दिला असला तरी, व्यवहारात मात्र हा दुजाभाव का, असा प्रश्न ग्रामीण मतदार आता उघडपणे विचारू लागले आहेत.
उमेदवारांची गोची आणि ग्रामीण भागाचा रेट – या फलकाचा सर्वाधिक फटका प्रचारासाठी जाणाऱ्या उमेदवारांना बसला आहे. गावात पाऊल टाकताच, साहेब, शहरात १५ चा रेट फुटलाय, मग आमच्या गावासाठी काय पॅकेज? असे प्रश्न लोक नजरेनेच विचारू लागल्याने उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे. हा फलक कोणी लावला हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी, त्याने दुखऱ्या नसवर बोट ठेवले आहे. शहरातल्यांनी लक्ष्मीदर्शन करून घेतले आणि आम्हाला फक्त आश्वासने मिळाली, अशी भावना ग्रामीण भागात बळावली आहे.
सोशल मीडियावर चर्चा आणि प्रशासनाला आव्हान – हळवल फाट्यावरच्या या फलकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. मटण आणि चिकनचा भाव वेगळा असू शकतो, पण मताचा भाव एरियानुसार कसा बदलू शकतो? असे उपहासात्मक टोमणे मारले जात आहेत. निवडणूक आयोग आणि पोलीस याची दखल घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, शहरात ‘नोट’ आणि गावात फक्त ‘वोट’, हा प्रकार आता खपवून घेतला जाणार नाही, असा सडेतोड इशाराच या ‘१५ हजारी’ फलकाद्वारे देण्यात आला आहे.

