पावस जिल्हा परिषद गट पारंपरिक भाजपचा बालेकिल्ला होता. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीमध्ये हा गट भाजपकडे गेला; परंतु त्यांच्यामध्ये अंतर्गत मतभेदामुळे फक्त कागदोपत्री युती होती. प्रत्यक्षात दोघांमध्ये प्रचंड मतभेद होते. त्यामुळे पुढे शिवसेनेच्या माध्यमातून अनेकवेळा बंडखोरी झाली. त्याचा फायदा तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फायदा घेतला. त्या दरम्यान, अनेक शिवसेनेच्या कार्यकत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. बंडखोरीमुळे शिवसेनेला २०१२ मध्ये शिवसेना-भाजप युती असताना शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रवीकिरण तोडणकर यांच्यासमोर शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पावसकर यांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने उभे असलेले बहुजन विकास आघाडीचे नंदकुमार मोहिते हे जिल्हा परिषदेवर निवडून गेले.
२०१४ मध्ये आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे या भागामध्ये शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे एकत्रीकरण झाल्यामुळे शिवसेना वरचढ ठरली होती. २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हा गट सर्वसाधारण झाल्यामुळे शिवसेनेतर्फे किरण तोडणकर व सुभाष पावसकर जे मागील निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर होते, त्यांनी त्या निवडणुकीचा खर्च सादर न केल्यामुळे २०१७च्या निवडणुकीमध्ये त्यांना निवडणूक लढवता आली नाही. शिवसेनेने अखेर आरती किरण तोडणकर यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेना व भाजप यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊन भाजपाच्या विनायक भाटकर यांना आरती तोडणकर यांचा सामना करावा लागला. यामध्ये शिवसेनेच्या आरती तोडणकर विजयी झाल्या.
२०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे तत्कालीन शिवसेनेचे आमदार यांनी शिंदेगटामध्ये प्रवेश केल्यामुळे या गटामध्ये शिवसेना दोन गटांमध्ये विभागले गेले; परंतु अनेक मतदार ठाकरे सेनेकडे राहिल्यामुळे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा सामना झाला. या गटांमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केल्यामुळे ठाकरेसेनेच्या उमेदवाराला अडीच हजाराचे मताधिक्य या भागामध्ये मिळाले; परंतु महायुतीचा उमेदवार निवडून आला. वरिष्ठ पातळीवरून महायुती जाहीर केल्यामुळे या गटातील कार्यकर्त्यांना मतभेद बाजूला ठेवून महायुतीचे काम करावे लागले.
अंतर्गत धुसफूस असूनही महायुतीचे चांगले काम झाले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून उदय सामंत यांना भाजपने पाठिंबा दिल्याने लोकसभा निवडणुकीतील मताधिक्य मोडीत काढून अधिकचे तीन हजारांचे मताधिक्य घेऊन महायुतीचे प्राबल्य सिद्ध झाले. आमदार सामंतांच्या आश्वासनाकडे लक्ष त्या वेळच्या प्रचारादरम्यान आमदार उदय सामंत यांनी महायुतीच्या माध्यमातून भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल आणि त्याला निवडून आणले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्या निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन सत्यात उतरते की, आश्वासनच राहते याकडे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत.
आमदार सामंतांच्या आश्वासनाकडे लक्ष – त्या वेळच्या प्रचारादरम्यान आमदार उदय सामंत यांनी महायुतीच्या माध्यमातून भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल आणि त्याला निवडून आणले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्या निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन सत्यात उतरते की, आश्वासनच राहते याकडे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत.
तिन्ही पक्षांची स्वबळाची तयारी – यावेळी खुले आरक्षण झाल्यामुळे ठाकरे सेनेकडून रवीकिरण तोडणकर इच्छुक आहेत. त्यांच्याबरोबर इच्छुक असलेले सुभाष पावसकर यांना पंचायत समिती किंवा पावस सरपंचपद देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे सेनेकडून एकमेव उमेदवार राहण्याची शक्यता आहे. भाजपाकडून माजी पंचायत समिती सदस्य सुशांत पाटकर यांची संधीची शक्यता आहे तसेच शिंदेगटाकडून नाखरेतील सेनेचे खंदे कार्यकर्ते विजय चव्हाण यांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत.

