लोटे एमआयडीसी व श्री क्षेत्र परशुराम या मधील जागेमध्ये या ‘भगवानदास’ कोकरे नामक महाराजाने “अध्यात्मिक वारकरी निवासीगुरुकूल” अशा गोंडस व सोज्वळ नावाने आश्रम सुरु केला होता.
जणू विकृतीचा बाजार! – या ‘भगवानदास’ कोकरे महाराजाने जणू विकृतीचा बाजार मांडल्याचे आज जगजाहीर झाले. त्याने हे वारकरी गुरुकूल जूनमध्ये सुरु केले. आपल्या ओळखीने त्यामध्ये मुलांना व मुलींना प्रवेश घ्यायला उद्युक्त केले व मग सोकावलेला बोका जसा लोण्याच्या गोळ्यावर तुटून पडतो तसा तो वागू लागला. पोलिसात थेट तक्रार करणाऱ्या पीडीत मुलीला त्याने ‘टार्गेट’ केले. अनेक महिन्यांपासून त्या मुलीला विलक्षण त्रास सोसावा लागला.
पीडीत मुलीचा व्हिडीओ – त्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसिध्द झाला आहे. पीडीत अल्पवयीन मुलगी रडत रडत तिला भोगावे लागलेले अनन्वीत अत्याचार स्वतः कथन करताना त्या व्हिडीओमध्ये. पहावयास मिळते. हा व्हिडीओ दै. ‘रत्नागिरी टाइम्स’कडे प्रसिध्दीसाठी आला परंतु सामाजिक बांधिलकीच्या भावनेने या व्हिडीओला दै. ‘रत्नागिरी टाइम्स’ तसेच ‘टाइम्स डिजीटल’मध्ये प्रसिध्दी न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुलीने सारे सांगितले – त्या पीडीत अल्पवयीन तरुणीने या ‘भगवानदास’ महाराजाने कसा छळ केला, कसा अनन्वीत अत्याचार केला, कसे लैंगिक शोषण केले ते सारे काही सांगितले आहे. त्या कोकरे महाराजाने त्या कथित आश्रमातील आणखी काही मुलींना देखील असाच त्रास दिल्याचे तिने सांगितले. त्या मुली देखील पोलिस स्थानकात तक्रार दाखल करणार आहेत का असे विचारता तिने ‘मला त्याबाबत काही माहित नाही’ असे सांगितले.
अन्य मुलींवर तेच प्रयोग ! – त्या पीडीत अल्पवयीन मुलीने स्पष्टपणे सांगितले की, “त्या आश्रम ातील आणखी काही मुलींना तो कोकरे महाराज अशाच प्रकारे त्रास देत होता.” हा व्हिडीओ सोशल मिडीयावर फार मोठ्या प्रमाणावर ‘व्हायरल’ झाला आहे. एकूण गुन्ह्याचे स्वरुप व गांभीर्य पाहता पोलिसांनी स्वतःहून दखल घेऊन त्या मुलींची तक्रार नोंदवून घेऊन कारवाई करायला हवी असे मत याबाबत बोलताना अनेक कायदेतज्ञांनी व बुजुर्ग नागरिकांनी व्यक्त केले.
मुलीच्या वडिलांचे पत्रक – तसेच त्या पीडीत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आपल्या सहीने एक पत्रक प्रसिध्दीला दिले आहे. दै. ‘रत्नागिरी टाइम्स’चे चिरणी (ता. खेड) येथील प्रतिनिधी श्री. सुरेश देवरुखकर यांनी ते पत्रक दै. ‘रत्नागिरी टाइम्स’कडे पाठविले. परंतु सामाजिक बांधिलकीच्या भावनेने त्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे नाव, गाव व अन्य माहिती प्रसिध्द न करण्याचा निर्णय दै. ‘रत्नागिरी टाइम्स’ व ‘टाइम्स डिजीटल ‘ने घेतला.
भगवान कोकरेचा तगादा – त्या पीडीत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “या भगवान कोकरे महाराजाने जून २०२५ मध्ये लोटे येथे ‘वारकरी गुरुकूल’ या गोंडस नावाने आश्रम सुरु केला. माझ्या मुलांना या गुरुकूलमध्ये घेऊन या अंसा भगवान कोकरे सतत फोन करुन तगादा लावत असे. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून माझ्या मुलांसाठी तेथे प्रवेश घेतला. माझी ४ मुले व १ पुतण्या अशा ५ मुलांना आम्ही तेथे शिकण्यासाठी घातले” असे त्यांनी सांगितले.
सिगरेट ओढताना सापडला – त्या पीडीत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पुढे सांगितले की, “माझी मुलगी खूप शांत होती. मी मुंबईत असल्याने तिथे काय घडत आहे याची मला कल्पना नव्हती. माझा मुलगा सिगरेट पिताना सापडला असे मला भगवान लोकरे यांनी सांगितले. त्यामुळे ‘तुमच्या मुलाला मी गुरुकूलमधून काढून टाकणार आहे’ असेही त्याने मला सांगितले. म्हणून मी नेमके काय आहे ते जाणून घेण्यासाठी गुरु. दि. ९ ऑक्टो. रोजी सायंकाळी मुंबईतून तेथे आलो” असे त्यांनी सांगितले.
मुलीचा पडका चेहरा – त्यांनी पुढे सांगितले, “मी तेथे गेलो परंतु काही सकारात्मक चर्चा झाली नाही. मी पुन्हा सोम. दि. १३ ऑक्टो. रोजी सायंकाळी गेलो तेव्हा माझी मुलगी पडक्या चेहऱ्याने बसली होती. तेव्हा मी ‘खरं काय घडलं आहे ते मला सांग’ असे विश्वासात घेऊन सांगितले तेव्हा ती हळूहळू रडत व्यक्त होऊ लागली व भगवान कोकरे यांनी तिचा लैंगिक छळ केल्याचे तिने सांगितले. तेव्हा मी हबकलो आणि खेड पोलिस स्थानकात तक्रार देण्यासाठी गेलो” अशा शब्दात त्यांनी सारे काही स्पष्ट केले.
मायबाप जनतेला विनंती – पीडीत मुलीच्या वडिलांनी सांगितले, “आता आम्हाला खरी गरज आहे ती सुजाण जनतेच्या पाठींब्याची. मी एक गरीब अडाणी बाप आहे. येथील मायबाप जनता सुजाण आहे. लोटे येथील जनतेने भगवान कोकरेचा धिक्कार करण्यासाठी गुरु. दि. १६ ऑक्टोबर रोजी स. १० वा. मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. त्या मोर्चात मायबाप जनतेने सहभागी होऊन माझ्या निष्पाप मुलीला न्याय मिळवून द्यावा अशी माझी हात जोडून मायबाप जनतेला नम्र विनंती आहे” अशा शब्दात त्यांनी आपली भावना स्पष्ट केली.
भगवान कोकरे ‘सोरट’ – हा भागोजी विठ्ठल उर्फ भगवान कोकरे महाराज म्हणे महाधुरंदर व ‘सोरट’ आहे. सत्ताधाऱ्यांची मानसिकता त्याने अचूक ओळखली होती. प्राप्त परिस्थितीत कीर्तन शिकवण्यासाठी त्याने म्हणे गुरुकूल सुरु केले तसेच गो शाळा सुरु केली आणि सत्ताधाऱ्यांची मानसिकता ओळखून त्याचा पुरेपूर फायदा करुन घेतला. कीर्तन शिकवण्यासाठी गुरुकूल तसेच गो शाळा चालविण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त लाभणार याची मनाशी खूणगाठ करुनच त्याने हा मांड मांडला असे मत याबाबत बोलताना जनतेतून सडेतोडपणे व्यक्त करण्यात आले.
परशुराम भूमीत विकृती – साऱ्या परशुराम भूमीतील ही विकृती जगजाहीर झाल्यानंतर कोकणातून गावोगाव तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सत्ताधाऱ्यांच्या नाजूक मानसिकतेचा अचूक लाभ घेऊ पाहणाऱ्या या ‘भगवानदास’ कोकरे महाराजाला फाशी झाली पाहिजे अशी मागणी आज अनेकांनी केली. त्याने जाणून बुजून हे सर्व केले असल्याचे स्पष्ट आहे.. ही पवित्र परशुराम भूमी या विकृत कोकरे महाराजाने नासवण्याचा प्रयत्न केला म्हणूनच त्याचा गुन्हा फार मोठा आहे ही बाब लक्षात घेऊन ही विकृती वेठीच ठेचून काढली पाहिजे असे मत जनतेतून सर्वत्र व्यक्त केले जात आहे.

