अमली पदार्थाविरोधात सिंधुदुर्ग पोलिस दल सक्रिय झाले आहे. बुधवारी (ता. १८) सायंकाळनंतर जिल्हाभर अमली पदार्थाच्या संभाव्य ठिकाणांवर एकाचवेळी छापे टाकले. या विशेष मोहिमेत कणकवलीजवळ एकाला रंगेहात पकडत गुन्हा दाखल केला. जिल्ह्यात नव्याने स्थापन करण्यात आलेले ‘अॅन्टी नार्कोटिक सेल’ सुद्धा पूर्ण ताकदीने सक्रिय झाले. जिल्ह्यात अमली पदार्थांचे नेटवर्क पसरू लागले आहे. याची पाळेमुळे ग्रामीण भागापर्यंत पसरली आहेत. सिंधुदुर्गाला या नशेच्या पडलेल्या मगरमिठीची पोलखोल ‘सकाळ’ने केली. ‘सिंधुदुर्गात ड्रग्जचे मायाजाल या मथळ्याखाली ‘सकाळ’मधून गेले चार दिवस सुरू असलेल्या मालिकेच्या माध्यमातून जिल्ह्यात नशेचे हे विष कसे पसरले आहे, हे समाजासमोर मांडले गेले.
इतक्या व्यापकपणे सिंधुदुर्गात या विषयासंदर्भात माध्यमांमधून पहिल्यांदाच वास्तव जगासमोर आले, जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी या नेटवर्क विरोधात आता मोहीम आणखी तीव्र केली आहे. त्यांनी जिल्ह्यातून ड्रग्ज शंभर टक्के हद्दपार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरच न थांबता, त्यांच्या आदेशाने जिल्हाभरातील पोलिस ‘अॅक्शन मोड मध्ये आले आहेत. पोलिसांनी अॅन्टी नार्कोटिक सेल स्थापन केला आहे. त्याच्या माध्यमातून अमली पदार्थांची पाळेमुळे शोधली जात आहेत.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांनी काल सायंकाळी सुमारे चार तास विशेष मोहीम राबविली. सायंकाळी अचानक जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रात अमली पदार्थ सेवन, वाहतूक, साठवणूक, विक्री यादृष्टीने छापासत्र सुरू झाले. सलग चार तास राबविलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पोलिस यंत्रणा सहभागी झाली. यावेळी कणकवली पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात एक व्यक्ती अमली पदार्थ सेवन करताना आढळल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या मोहिमेबाबत अत्यंत गोपनीयता बाळगली गेली. काही मोजके पोलिस अधिकारी वगळता अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना याची पूर्वकल्पना सुद्धा नव्हती.
पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी अचानक सावंतवाडी व कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिस निरीक्षक आणि सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांची बैठक बोलावली. त्यांना तातडीने अमली पदार्थ सेवन, वाहतूक, साठवणूक, विक्री यादृष्टीने कारवाईबाबतचे आदेश दिले. गोपनीयता बाळगून अचानकपणे राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी व वेगवेगळ्या ठिकाणी सर्व १३ पोलिस ठाणी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांच्याकडून छापासत्र व शोध मोहीम राबविली.