वाटद एमआयडीसीमध्ये कोणते प्रकल्प येणार याबाबत एमआयडीसीची भूमिका स्पष्ट नाही. त्यातच याठिकाणाहून कोस्टल हायवे जात आहे. त्यामुळे येथील जागांना सोन्याचे भाव आले आहेत. एमआयडीसीला कवडीमोल भावाने जागा का विकावी असे मत कळझोंडी ग्रामस्थांनी मांडले. त्याचप्रमाणे याठिकाणी शासनाने कंपनी आणण्यापेक्षा पर्यटन विकासावर शासनाने भर द्यावा असे म्हणणे ग्रामस्थांनी मांडले. आमच्या जागा आम्ही देणार नाही, शासनाने, पोलिसांनी सक्ती केली तर गुराढोरांसह आम्ही जिल्हाधिकारी कचेरीत येऊन बसू, असेदेखील यावेळी ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले. वाटद एमआयडीसी संदर्भात कळझोंडी गावातील ग्रामस्थांच्या वैयक्तिक आक्षेपांवर सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात ही सुनावणी पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, आमच्या जागा वाचवण्यासाठी निकराचा लढा देत आहोत. आमचे साधे ३ प्रश्न आहेत. आम्ही आंबा, काजू बागायतदार आहोत. त्याठिकाणी पर्यटन विकसित होत आहे. कारण आमच्याकडून कोस्टल हायवे विकसित होत आहे. आमच्या करोडो रुपयांच्या जागा कवडीमोल भावाने का द्यायच्या हा प्रश्न आहे.
२२०० एकर जागा – डेव्हलपमेंटच्या बाबतीत हे काही सांगत आहेत, स्थानिकांना फारसे रोजगार उपलब्ध झालेले नाहीत. उद्योगधंदे विकसित होतील म्हणून २२०० एकर जागा घेतली जात आहे. मात्र कोणते प्रकल्प येणार याचे प्रशासनाकडे कोणते उत्तर नाही आहे. आम्ही वर्षानुवर्ष त्या ठिकाणी रहात आहोत, त्यावर घाला घालू नका, आमचा विकास करायचा असेल तर पर्यटनातून करा, आंबा-काजू शेती डेव्हलपमेंटच्या माध्यमातून करा.
गुराढोरांसह येऊन बसू – पोलीस व प्रशासनाने दडपशाही केली गेली तर आम्ही गुरे, जनावरे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन बसू असा इशारा कळझोंडी ग्रामस्थांनी दिला आहे. जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून सायंकाळी झालेल्या या सुनावणीला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. अधिसूचना रद्द होत नाही तोपर्यंत आमचा विरोध आहे. दलाल, राज्यकर्ते, नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे हित आहे हे दिसून येत आहे. एम आयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे काहीच स्पष्ट नाही आहे. आमच्या जागा घेऊन एमआयडीसी नंतर करोडो रुपयांना विकणार. त्यापेक्षा आम्हीच त्या करोडो रुपयांना विकू असेही ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान पुढील वैयक्तिक सुनावणी या प्रांताधिकारी कार्यालयातच होणार असल्याचेहीं प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.