जिल्ह्यात अमली पदार्थ सेवन आणि विक्री करणाऱ्या सहा जणांना दोन दिवसांत अटक केली. ही कारवाई संगमेश्वर, चिपळूण आणि दापोली येथे केली. जिल्ह्यात आठवडाभर सातत्याने अमली पदार्थ सेवन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. संगमेश्वर तालुक्यात पोलिसांचे पथक आरवली बाजारपेठ, आरवली रेल्वे स्टेशन येथे गस्त घालताना आरवली हायवे ब्रीजखाली उभ्या असलेल्या मोटारसायकल (एमएच ०८ एजे ३३९८) वरील दोघांच्या हालचाली संशयित वाटल्याने त्यांना त्यांचे नाव, गाव विचारता त्यांनी आपले नाव सुभाष बाबू लोंढे (वय ४५, रा. खेरशेत, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी), अमित कुमार नागेश्वर साव (३०, रा. ग्राम रामगड शिवमंदिरशेजारी, पोस्ट कवळ, जि. पलामू, राज्य झारखंड, सध्या रा. कोळबे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे सांगितले. त्यांची तपासणी केली असता त्यांनी शर्टाच्या आतमध्ये लपवून ठेवलेल्या पिशव्या सापडल्या.
त्यामध्ये २४१ ग्रॅम गांजासदृश अमली पदार्थ मिळून आला. गांजा कोठून आणला, याबाबत चौकशी केली असता त्यांनी यासिन महामूद काद्री (रा. अडरेकर मोहल्ला, सावर्डे, ता. चिपळूण) यांच्याकडून आणल्याचे सांगितले. पथकाने यासिन महामूद काद्री याच्या घराच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता २६३ ग्रॅम गांजासदृश पदार्थ मिळून आला. तिन्ही संशयितांविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. संशयित सुभाष बाबू लोंढे, अमित कुमार नागेश्वर साव, यासिन महामूद काद्री (अडरेकर मोहल्ला, सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांच्याकडून एकूण ५०४ ग्रॅम गांजासदृश पदार्थ व दुचाकीसह एकूण ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसरी कारवाई चिपळूण शहरातील गोवळकोट रोड परिसरात केली. तेथे दोघांना ताब्यात घेण्यात आले. राज राजेश लांजेकर (वय २१, रा. लांजा बाजारपेठ, सध्या रा. पालवण-सावर्डे, चिपळूण), शैलेश प्रकाश कदम (३४,रा. मिरजोळी बौद्धवाडी, चिपळूण) अशी गुन्हा दाखल केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलिस नाईक रोशन शंकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राज लांजेकर हा गोवळकोट रोड येथील पालोजी बाग येथे वाशिष्ठी नदीकिनारी सोमवारी दुपारी ३.३० वाजता एका झाडाखाली बसून गांजाचे सेवन करताना आढळला. तसेच पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा अनुबा दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शैलेश प्रकाश कदम हा गोवळकोट रोड येथील मोहसीन अपार्टमेंटच्या परिसरात सोमवारी सायंकाळी ४.४५ वाजता अमली पदार्थाचे सेवन करताना दिसून आला. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.
तिसरी कारवाई दापोली बाजारपेठेतील चिल्लंगी मोहल्ला येथे एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या टेरेसवर करण्यात आली. येथून तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मोहम्मद जमा इस्तफाक अहमद शेख (वय २८, मूळ रा. दर्गजोत संत कबीरनगर, उत्तरप्रदेश, सध्या रा. दापोली, चिल्लंगी मोहल्ला) हा दापोली बाजारपेठ येथील एका इमारतीच्या टेरेसवर गांजा ओढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कॉन्स्टेबल उदय टेमकर यांनी घटनास्थळी छापा टाकला आणि शेख याला गांजा सेवन करताना पकडले. याप्रकरणी कॉन्स्टेबल उदय टेमकर यांच्या फिर्यादीवरून मोहम्मद शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.