मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर रत्नागिरी शहरातील पुतळ्यांबाबत पालिका अधिक सजग झाली आहे. त्याअनुषंगाने शहरातील सहा पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. आता सातही पुतळ्यांच्या मजबुतीसाठी रेडिओलॉजिस्ट यांच्याकडून पूर्ण स्कॅनिंग करून घेतला जात आहे. पुतळ्याला काही भंग झाला आहे का, असल्यास त्याची तत्काळ जे. जे. स्कूल संस्थेकडून दुरुस्ती करून घेतली जात आहे. शिर्के उद्यान येथे चार महिन्यांपूर्वी १ कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये देखील साच्यातील गॅपमुळे काही भागाला पोपडे सुटले होते. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.
अशा प्रकारे प्रत्येक पुतळ्याचे बारकाईने स्कॅनिंग करून दुरुस्ती केली जाणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिटसाठी खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. पुतळ्यांचा पाया, चबुतरा, पुतळा किती मजबूत आहे, दुरुस्तीची गरज आहे का, याचा अहवाल या संस्थेने दिला आहे. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील सर्वच पुतळ्यांचा विषय ऐरणीवर आला. पालिका, महापालिकांनी शहरातील पुतळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाउले उचलण्याचे आदेश शासनाने काढले. त्यानुसार रत्नागिरी मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी शहरातील पुतळ्यांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून सर्वच पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला.
माळनाका येथील कुणबी समाजाचे प्रणेते शामराव पेजेंचा पुतळा, शहरातील मध्यवर्ती असलेल्या मारुती मंदिर सर्कलमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा, जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, शहरातील लक्ष्मी चौक येथील विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा, मंत्री उदय सामंत यांच्या कल्पनेतून रत्नागिरीमध्ये सर्वांत उंच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा, माळनाका येथे शिर्के उद्यानमध्ये विठ्ठलाची आकर्षक मूर्ती, अशा सहा पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले. आता रेडिओलॉजिस्टकडून पुतळ्यांचे स्कॅनिंग केले जात आहे.