मोबाईल अँपमध्ये वन्यप्राणी बचावकार्य करतानाचे जिओटॅग फोटो व नैसर्गिक अधिवासात सोडतानाचे जिओटेंग फोटो व व्हिडीओ अपलोड करणे आवश्यक राहणार आहे. यामुळे सर्पमित्रांवर वनविभागामार्फत नियंत्रण ठेवता येणार आहे व सर्पमित्र अवैधकृत्य करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे बेन यांनी सांगितले. आंजर्ले, वेळास येथील कासवांच्या घरट्यांसंबंधी पाहणी करण्यासाठी ते दापोलीत आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. अप्पर प्रधान मुख्य वनसरक्षक व्ही. क्लेमेंट बेन यांनी वनविभागास सर्पमित्रांच्या समस्या सोडविणेसाठी समिती तयार करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या वेळी विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली, वैभव बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी (कांदळवन कक्ष) किरण ठाकूर, दापोली वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी उपस्थित होते.
सर्पमित्रांसाठी ओला, उबेर यासारखे मोबाईल ॲप्लिकेशन तयार करून, महाराष्ट्रातील सर्व सर्पमित्रांची नोंदणी केली जाणार आहे. सर्पमित्रांना प्रशिक्षण देवून त्यांची गुणवत्ता तपासूनच त्यांची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे. या मोबाईल ॲपमुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात कोणकोणत्या प्रजातीचे सर्पवर्गीय वन्यप्राणी आढळून येतात याची माहिती मिळणार आहे, अशी माहिती अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व्ही. क्लेमेंट बेन यांनी दिली.
दापोली येथील सर्पमित्र संघटनेने राज्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक पश्चिम प्रदेश मुंबई यांची आंजर्ले येथे भेट घेतली. स्थानिक स्तरावर वनविभागाशी समन्वय साधून वन्यप्राणी बचाव करताना येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा केली व सर्पमित्रांना ओळखपत्र व ड्रेसकोड वनविभागामार्फत अधिकृत करण्याबाबत मागणी केली आहे.