28.6 C
Ratnagiri
Thursday, March 30, 2023
HomeRatnagiriमरेपर्यत उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक राहणार – आम. राजन साळवी

मरेपर्यत उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक राहणार – आम. राजन साळवी

मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. त्यामुळेच मला ACBची नोटीस आली आहे.

शिवसेनेचे ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) नोटीस बजावल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेत एसीबीकडून आलेल्या नोटिशीवर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. राजकीय उलथापालथीनंतर मी निष्ठावंत राहिलो. मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. त्यामुळेच मला ACBची नोटीस आली आहे. यंत्रणांचा वापर करत नोटीसा दिल्या जात असल्याचा आरोप आमदार साळवी यांनी यावेळी केला.

याच पार्श्वभूमीवर एसीबीच्या नोटिशीनंतर आमदार राजन साळवी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. तुरुंगात डांबले तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे साळवी यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी या सर्व प्रकरणाच्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप केला.

राजन साळवी हे शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. आमदार साळवी यांनी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत चर्चा सुरू होत्या. राजन साळवी यांनी या मुद्यावर आज भाष्य केले. तुरुंगात गेलो तरी आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहणार, असे आमदार साळवी म्हणाले. मला स्वकीयांचा, पक्षातील कोणत्याही व्यक्तीचा त्रास नाही. आपण पाठिशी असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे साळवी यांनी सांगितले.

१५ दिवसांची मुदत द्या, अशी मागणी आपण एसीबीकडे केली असल्याचे ते म्हणाले. एसीबीने आमदार साळवी यांना अलिबाग येथे सोमवारी म्हणजे उद्या ४ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. या दरम्यान, एसीबीने मला अटक केली तरी चालेल. मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. मी मरेपर्यंत तुरुंगात राहीन. पण कुठेही जाणार नाही, असेही आमदार राजन साळवी म्हणाले. हिंमत असेल तर गुन्हा दाखल करून दाखवा, ही लढाई मी आणि माझे कुटुंब लढणार आहे. किती दबाव आणला तरी पक्षातून जाणार नाही. शिवसेना सोडणार, असे मी कधी म्हटले नाही. शिवसेनेचे ४० वर्षे काम करतोय. मरेपर्यत उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक राहणार, असे साळवी यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular