रत्नागिरी पालिकेने स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहाच्या वीज बिलावर होणारा खर्च कमी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. १० कोटी खर्च करून नूतनीकरण करण्यात आले असताना आता ६७ लाख रुपये खर्च करून नाट्यगृहावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याची निविदा प्रक्रिया झाली असून, लवकरच वर्कऑर्डर दिली जाणार आहे. यामधून ७५ किलो वॅट वीज निर्मिती होणार असल्याने नाट्यगृहाचा वीज बिलाचा ५० टक्के खर्च कमी होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे जिल्हा नियोजनमधून हा निधी उपलब्ध करून दिला आहे.
स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी पालिकेच्या मालकीचे असून, ते २००६-२००७ ला सुरू झाले. कोकणातले सर्वात मोठे नाट्यगृह असले तरी अनेक सुविधांचा अभाव असल्याने कलाकारांसह आयोजक, प्रेक्षकांना याचा त्रास होत होता. या ठिकाणची वातानुकूलिन यंत्रणा डिझेलवर चालत होती. कूलिंगसाठी बर्फाच्या लाद्या टाकाव्या लागत होत्या. साऊंडसिस्टिम प्रभावी नव्हती. या त्रुटींबाबत नाट्यकर्मीना पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर त्यांनी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर अल्पावधीत नाट्यगृह अद्ययावत करण्यात आले. आता वातानुकूलिन यंत्रणा विजेवर चालते.
नाट्यगृहातील इतर उपकरणेसुद्धा विजेवर चालणारी आणि दर्जेदार आहेत. यामुळे दरमहा ७० हजारांवर वीज बिल येते. आता हा खर्च वाचवण्यासाठी नाट्यगृहाच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. ७५ किलोवॅटचा हा प्रकल्प असून, त्यासाठी ६७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याची निविदा काढण्यात आली आहे. लवकरच काम सुरू केले जाणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प सुरू झाल्यानंतर ७५ किलोवॅटचा या प्रकल्प पालिकेला मिळणाऱ्या वीज बिलामध्ये ५० टक्के वीज बिल वाचणार आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्यासह विद्युत विभागाचे अभियंता धनंजय चव्हाण यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे.