कोकणचा हापूस मुंबईतील वाशीसह पुणे, अहमदाबाद बाजारात दाखल झाला आहे. मात्र, हापूसपुढे परराज्यातील आंब्याचे आव्हान निर्माण झाले आहे. वाशी बाजारात सोमवारी (ता. १९) दाखल झालेल्या एकूण ९ हजार १२१ पेट्यांमध्ये परराज्यातील ४ हजार २० पेट्या होत्या. त्यामुळे सध्या हापूसचा दर चार ते आठ डझनच्या पेटीला ३ हजारांपासून ६ हजार रुपयांपर्यंत मिळत आहे. हा दर गतवर्षीपेक्षा कमी असल्याचे बागायतदारांचे मत आहे. पहिल्या टप्यात हाती आलेल्या हापूस उत्पादनाला चांगला दर मिळणे अपेक्षित असतानाच वाशीतील वाढत्या उलाढालीने बागायतदारांची चिंता वाढवली आहे. यंदा ऑक्टोबरच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कोकणात हापूसचा हंगाम चांगला जाईल, असे अंदाज बांधले जाऊ लागले.
त्यानंतर उशिरा आलेली थंडी, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि उन्हाचा कडाका अशा विचित्र वातावरणाचा आंबा हंगामाला काळा टिळा लागला. सध्या थ्रिप्सने बागायतदार त्रस्त झाले असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधावर मोठा खर्च सुरू आहे. तरीही जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापासून रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील हापूसच्या पेट्या वाशीसह अन्य बाजारात पाठवल्या आहेत. गतवर्षीपेक्षा कोकणातील हापूसचे प्रमाण अधिक आहे. सुरुवातीलाच पाच डझनच्या पेटीला सहा हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला होता. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यानंतर पेट्यांची संख्या प्रतिदिन पाच हजारांवर पोहोचली आहे.
सोमवारी ५ हजार १०१ पेट्या बाजारात आल्या आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील साधारणपणे ३० ते ४० टक्के असल्याचे वाशीतील व्यावसायिकांचे म्हणणे आहे. उर्वरित सर्व देवगड येथील माल आहे. या बरोबरीने परराज्यातील म्हणजेच कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथील पेट्यांची संख्या ४ हजार २० इतकी आहे. तुलनेत यंदा परराज्यातील पेट्या अधिक आल्या आहेत. गतवर्षी हापूसला पेटीपेक्षा ७ हजार रुपयांपेक्षा अधिक मिळत होते. याबाबत वाशी बाजार समितीचे संचालक तथा व्यावसायिक संजय पानसरे म्हणाले, कोकणातील हापूसच्या पेट्या गतवर्षीपेक्षा अधिक आहेत. आवक अधिक असल्यामुळे त्यानुसार दर निश्चित केले जात आहेत. हापूसच्या बरोबरीने परराज्यातील आंबेही विक्रीला आलेले आहेत.