राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनात भरघोस वाढ करण्याचे जाहीर केले. तसंच ही पगार वाढ नोव्हेंबर महिन्यापासून देऊ असंही सरकारने म्हटले. मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी अंतरिम पगारवाढ मान्य नाही, आम्हाला विलिनीकरणच हवं आहे या मागणीवर कर्मचाऱी ठाम आहेत. संप फुटण्यासाठी आम्हाला सरकारने पगारवाढीचे गाजर दाखवू नये अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे काही कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत.
परिवहन मंत्र्यांनी पगारवाढीची घोषणा करूनही एसटी कर्मचारी काम बंद आंदोलनावर ठाम असल्याने, एसटी कर्मचाऱ्यांची आम्ही उद्या सकाळपर्यंत वाट पाहू. त्यानंतर कठोर निर्णय घेऊ, असा आता स्पष्ट इशाराच परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी दिला आहे. आंदोलन तुटेपर्यंत ताणू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज्य सरकारने बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये घसघशीत वाढ केली. त्यानंतर आम. पडळकर आणि खोत यांनी आझाद मैदानातून या आंदोलनातून माघार घेत असल्याचे जाहीर केले आणि पुढील निर्णय कर्मचाऱ्यांवर सोपवला. आता एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप संपला, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, त्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या हाती घेत, विलीनीकरणापर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा गुरुवारी दिला. अनेक एसटी कर्मचारीही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत
परंतु काल रत्नागिरी जिल्ह्यातील २०३ कर्मचारी कामावर हजर झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे चार आगारांतून काही बस फेऱ्या देखील सुरू झाल्या आणि प्रवाशांना अल्प दिलासा मिळाला. जिल्ह्यामध्ये काल देवरूख, राजापूर आणि चिपळूण आगारातून काही बस फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. काल जिल्ह्यात एकूण ९ फेऱ्या सोडण्यात आल्या. रत्नागिरी विभागात एकूण ४१७१ कर्मचाऱ्यांपैकी १३१ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. राजापूर डेपोतून सुद्धा काही प्रमाणात बस वाहतूक सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. परिवहन मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे संपकरी प्रमाणे निलंबित कर्मचारीही हजर होऊ लागल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई टळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.