२ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीच्या पथकाने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूडेलिया क्रूझवर छापा टाकला. यावेळी तेथून १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम मेफेड्रोन, २१ ग्रॅम गांजा, २२ एमडीएमएच्या गोळ्या आणि रोख १.३३ लाख रुपये जप्त करण्यात आले.
एजन्सीने क्रूझमधून १४ लोकांना पकडले होते आणि अनेक तासांच्या चौकशीनंतर आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुम धमेचा यांना ३ ऑक्टोबर रोजी दुपारी अटक केल्याचे दाखवण्यात आले. यानंतर हळूहळू या प्रकरणात आणखी १७ जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी आर्यन आणि त्याच्या साथीदारांना जामीन मंजूर करण्यात आला.
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे. यानंतर त्यांनी पासपोर्ट परत करण्यासाठी विशेष एनडीपीएस न्यायालयात याचिका दाखल केली. लाइव्ह लॉच्या रिपोर्टनुसार, विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आज या प्रकरणावर सुनावणी करताना आर्यन खानचा पासपोर्ट परत करण्याचे निर्देश नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला दिले आहेत. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यनला २६ दिवस कोठडीत ठेवण्यात आले होते.
आर्यनने ३० जून रोजी आपल्या वकिलामार्फत ही याचिका दाखल केली होती. मे महिन्यात तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात मला आरोपी बनवण्यात आले नसल्याचे आर्यनने अर्जात नमूद केले होते. यानंतर त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यामुळे माझा पासपोर्ट परत करण्यात यावा. अखेर त्यावर निर्णय झाला आहे.