श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे देश सोडून मालदीवमध्ये पळून गेले आहेत. राजपक्षे यांनी देश सोडल्यानंतर श्रीलंकनवासीयांचा संताप उफाळून आला आहे. राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर आंदोलक प्रचंड दंगली करत आहेत. जनतेचा तीव्र विरोध पाहून पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.
हजारो लोक संसद भवनाकडे मार्च करत आहेत. अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली. दोन्ही गटांमध्ये हाणामारीही झाली असून त्यात ३० जण जखमी झाले. पंतप्रधान रानिल विक्रनसिंघे यांची देशाचे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी, आंदोलकांनी या प्रकरणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांवर हेलिकॉप्टरद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हवाई गोळीबार करावा लागला.
कार्यवाहक राष्टपती रानिल विक्रमसिंघे यांनी सांगितले की, श्रीलंकेतील सद्यस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संरक्षण दलाचे प्रमुख, त्रिदल कमांडर आणि पोलीस महानिरीक्षक यांना जबाबदारी देण्यात आली आहे. रानिल विक्रमसिंघे यांनी एका विशेष व्हिडिओ निवेदनात सांगितले की, या समितीवर सर्व नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची आणि सुव्यवस्था पुनर्संचयित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
विक्रमसिंघे हे सध्या अज्ञातस्थळी आहेत. ते देशामध्येच असून त्यांचे आदेश आणि संदेश जारी करत आहेत. तत्पूर्वी, आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानालाही आग लावली होती आणि बुधवारी पंतप्रधान कार्यालयावरही ताबा मिळवला. ८ जुलैपासून गोटबाया कोलंबोमध्ये दिसले नव्हते. ते १२ जुलै रोजी मंगळवारी नौदलाच्या जहाजातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बंदरातील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी पासपोर्टवर शिक्का मारण्यासाठी व्हीआयपी सूटमध्ये जाण्यास नकार दिला.