उन्हाळी सुट्टी हा अनेकांच्याच जिव्हाळ्याचा विषय. अगदी शालेय आणि महाविद्यालयीन आयुष्य मागे पडलेलं असताना आणि नोकरीची कारकिर्द सुरु झालेली असताना सुद्धा अनेकांसाठी उन्हाळी सुट्टी मात्र अद्यापही दुरावलेली नाही. अशा या उन्हाळी सुट्टीनिमित्त अनेकांचीच पावलं विविध पर्यटनस्थळांकडे वळतात. पण, त्यातही गावाकडे आणि प्रामुख्यानं कोकणाकडे जाणाऱ्यांचा आकडा मात्र मोठा असतो. याच प्रवासीसंख्येकडे पाहता कोकण रेल्वे प्रशासनानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता हा आकडा विभाजित करण्यासाठी आणि प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या साथीनं कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळ्यात विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. यासाठीची सविस्तर माहिती रेल्वे विभागानं जारी केली असून, त्यानुसार मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२ सीएसएमटी-करमाळी – सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी धावणार आहे.
कसं आहे वेळापत्रक ? – गाडी क्रमांक ०११५१ छत्रपती शिवाजी महाराज राज टर्मिनस अर्थात सीएसएमटी ते करमाळी विशेष (साप्ताहिक) १० एप्रिल ते ५ जूनपर्यंतच्या काळात दर गुरुवारी सीएसएमटीहून (उडवढ) रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटेल. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी दुपारी १ वाजून ३० पर्यंत करमाळी इथं पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५२ करमाळी ते सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) वरील रेल्वेच्याच निर्धारित दिवसांमध्ये धावणार असून, दर गुरुवारी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी ती करमाळीवरून निघेल आणि ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी रात्री ३ वाजून ४५ मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचेल. वरील दोन्ही गाड्या २२ डब्यांच्या असतील असं सांगण्यात येत आहे. गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी विशेष (साप्ताहिक) ही विशेष रेल्वेगाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनमधून रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटेल. गाड्यांच वेळापत्रक पाहता रेल्वेच्या अधिकृत तिकीट आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे.