चिपळुणात नालेसफाईला वेग : पावसाळ्यासाठी पालिकेची सतर्कता; ६५ टक्के काम पूर्ण, ३१ मेपर्यंत मुदत

36
Speed ​​of drain cleaning in Chiplun

शहरात नालेसफाईचे काम जोमाने सुरू आहे. आतापर्यंत ६५ टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. ३१ मे अखेर शंभर टक्के नालेसफाई पूर्ण केली जाईल, अशी माहिती आरोग्यविभागाचे प्रमुख वैभव निवाते यांनी दिली. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे शहरातील नालेसफाईचे काम जोमाने सुरू आहे. चिपळूण शहरातील नागरिकांना पावसाळ्याच्या अनुषंगाने नालेसफाईचा विषय चिंतेचा ठरतो. शहरातील सामाजिक कार्यकर्ते पालिकेत धडक देऊन नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याची मागणी करत आहेत; मात्र पालिकेने दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम नेहमीपेक्षा आधी सुरू केले आहे. याबाबत माहिती देताना निवाते म्हणाले, ३१ मेपर्यंतच्या निश्चित केलेल्या मुदतीपूर्वीच नालेसफाईचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश येईल. नगर पालिकेच्या मालकीचे एक जेसीबी आणि पालिकेचे १६५ सफाई कामगार आहेत. त्यांच्यामार्फत शहरातील गटार आणि नाल्यांची सफाई सुरू आहे. नालेसफाईसाठी सहा भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक कामगारांना क्षेत्र वाटून देण्यात आले आहेत. शहरातील अनेक छोट्या नाल्यांच्या सफाईविषयी नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

३१ मेची मुदत संपुष्टात येण्यासाठी अजून २० दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे नाल्यांमधील सफाईविषयी स्थानिक समाधानी होतील. याही वर्षी पालिकेने नालेसफाईचा मुहूर्त एप्रिल महिन्यात शोधला आहे. शहरातील गटारांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, दारूच्या बाटल्या, गाड्यांचे टायर, हॉटेलमध्ये शिल्लक राहिलेला कचरा, विविध टाकाऊ वस्तू गटारात टाकल्या जातात. त्यामुळे गटारे तुंबतात. नागरिकांनी ते टाकू नये, अशी विनंती आहे. पालिकेमार्फत कचरा गोळा करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. कचरा गोळा करणारी घंटागाडी शहरात फिरते; परंतु काही नागरिक मोठ्या प्रमाणावर घरातील कचरा उघड्यावर टाकतात. बऱ्याचवेळा हा कचरा गटारात साचून राहतो. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये, असे निवाते यांनी सांगितले.

स्वच्छता सुरू असलेले नाले – पॉवरहाऊस ते शिवनदी, पंचायत समिती ते शिवनदी, खेंड बायपास ते शिवनदी, डिगी पाली ते घोरपडे घर, उक्ताड गोडावून ते वाशिष्ठी नदी, पेठमाप सारा अपार्टमेंट ते वाशिष्ठी नदी, गोवळकोट बांद्रे शेत ते वाशिष्ठी नदी, कोर्ट ते दगडी पूल, परांजपे घर ते कराड रेंड ते शिवनदी, प्रांत कार्यालय ते पाटणकर हॉस्पिटल, विंध्यवासिनी परिसर ते बहादूरशेख, गोवळकोट रोड कमानी ते चरापर्यंत, लक्ष्मीबिल्डिंग नाला बाजारपेठ, रोटरी क्लब भोगाळे ते माधव सभागृह.