मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित परशुराम घाटातील अतिशय कठीण कातळ फोडण्यासाठी नऊ महिने लागले. आता तो कातळ पूर्णपणे फोडण्यात यश आल्यानंतर तेथील रखडलेल्या दुसऱ्या लेनच्या काँक्रिटीकरणाचे काम तातडीने सुरू झाले आहे. परशुराम घाट ते आरवली दरम्यान ३६ किमी अंतरात केवळ सव्वाकिमीचे काँक्रिटीकरण शिल्लक आहे. गणेशोत्सवापूर्वी उर्वरित काम मार्गी लागल्यास चिपळूण हद्दीत महामार्गावरील प्रवास वेगाने होणार आहे.
घाटातील चिपळूण हद्दीतील इगल इन्फ्रा कंपनीने या आधीच काम पूर्ण केले; परंतु खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनीमार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन अनेक दिवस थांबले होते. या ठिकाणी २२ मीटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला होता. आता कातळ फोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या दुसऱ्या लेनचे काम वेगाने सुरू आहे.
काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने त्या आधी घाटात चौपदरीकरणातील दुसराही मार्ग सुरू करण्यावर भर दिला जात आहे. पावसाळ्यात महामार्गावर आलेली माती हटवण्यात येत आहे. त्यानंतर काँक्रिटीकरणाचे कामही तातडीने हाती घेतले जाईल. त्यासाठी गेले तीन दिवस सपाटीकरणाचे काम सुरू आहे. काँक्रिटीकरण पूर्ण करून घाटातील दोन्ही मार्ग वाहतुकीस खुले केले जातील.