व्यापारी महासंघात अखेर मोठी फूट पडली असून, १२० व्यापाऱ्यांनी एकत्र वेगळी चूल मांडली आहे. चिपळूण व्यापारी एकता या नावाखाली २३ व्यापाऱ्यांची वेगळी समिती स्थापन केली. त्यात सहा ज्येष्ठ व्यापाऱ्यांची समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे. यापुढे चिपळूण व्यापारी महासंघटनेशी कोणताही संबंध राहणार नाही, असेही बैठकीत स्पष्ट केले. चिपळूणमधील व्यापारी महासंघटनेत गेल्या काही महिन्यांपासून धुसफूस सुरू होती. मध्यंतरी मोर्चा आणि बाजारपेठ बंदचा घेतलेला निर्णय अनेक व्यापाऱ्यांना पटला नव्हता. त्यामुळे नाराजी उफाळली होती. त्याचवेळी ज्येष्ठ व्यापारी शिरीष काटकर यांच्यासह काही व्यापाऱ्यांनी वेगळा निर्णय घेण्याची हालचाल सुरू केली होती. त्याअनुषंगाने गणेशोत्सवापूर्वी निवडक व्यापाऱ्यांची एक बैठक झाली.
गणपती उत्सवानंतर अंतिम निर्णय घेण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. त्यानुसार शहरातील चितळे मंगल कार्यालय सभागृहात व्यापाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत काहींनी समितीचे उद्देश आणि पुढील वाटचालीबाबत भूमिका मांडली.
समितीत सुधीर शिंदे, संजय जाधव, बिलाल पालकर, लियाकत शहा, संजय तांबडे, वीरेन कोकाटे, सनी भाटिया, संतोष पवार, विलास चिपळूणकर, सचिन गायकवाड, इम्रान पालकर, अबुल बेबल, इसा हळदे, भाई गुढेकर, जगदीशचंद्र गुलाठी, निखिल किल्लेकर, अस्लम मेमन, शैलेश टाकळे, सचिन पाटेकर, शेखर लवेकर, कादीर मुकादम, तसेच सचिव संदीप लवेकर, खजिनदार जतीन आंबुर्ले यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय शिरीष काटकर, अरुण भोजने, सतीश खेडेकर, भरत गांगण, बाळा कदम, सुरेश पवार या ज्येष्ठ व्यापाऱ्यांची समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे.