चिपळूण आगारातील संपकाळात सेवा बजावलेल्या २३ कंत्राटी चालकांना ऐन गणेशोत्सवात कल्पना न देताच कमी करण्यात आले आहे. त्यामुळे सणासुदीत या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. एसटी महामंडळ राज्यशासनात विलिन व्हावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी डिसेंबरपासूच बेमुदत संप पुकाराला होता. हा संप मागे घेण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले गेले. परंतु, संपकरी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने यातूनच हा संप आणखीन लांबत गेला.
परिणामी संपकाळात सर्वच प्रवासी सेवाच ठप्प झाल्याने एसटी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. संपकरी कमर्चारी ऐकेना त्यामुळे यावर तोडगा म्हणून एसटी महामंडळाने तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेतले. आणि त्यांच्या सहाय्याने ठप्प झालेली प्रवासी सेवा पुन्हा कार्यान्वित झाल्या होत्या.
या कंत्राटी चालकांना प्रत्यक्षात तीन महिन्यांच्या करारावर सामावून घेण्यात आले होते. तीन महिने पूर्ण झाल्यानंतरही त्यांना चालक म्हणून सामावून घेतल्याने व यातूनच त्यांचा कालावधी वाढून सात महिन्यांवर पोहचला. एसटी संपकाळात प्रवाशांना सेवा देण्यासाठी महामंडळाने कंत्राटी पद्धतीवर चालकांना सामावून घेतले होते. या कामगारांमुळे ठप्प झालेली प्रवासी सेवा सुरू झाल्याने एक प्रकारे प्रवाशांमध्येही समाधान पसरले होते.
हे कंत्राटी चालक दिलेली कामगिरी प्रामाणिकपणे बजावत होते. मात्र असे असताना ऐन गणेशात्सवात ३ सप्टेंबरला कोणतीही पूर्व कल्पना न देता चिपळूण आगारातील २३ चालकांना कमी करण्यात आले आहे. त्यांचे मूळ वेतनही कमी करण्यात आले असून, ऐन गणशोत्सवात हा प्रकार घडल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. संपकाळात कंत्राटी चालकांमुळे प्रवासी सेवा सुरू झाली असताना त्यांना अचानक कमी केल्याने ते पुन्हा सामावून घेण्याची मागणी जोर धरत आहेत.