मागील पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील एसटी सेवा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. शासनाकडून कारवाया मागे घेण्याचे आश्वासन देऊन, महामंडळाकडून कामगारांना कामावर परत येण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही अद्याप कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत.
राज्यातील एसटी सेवा सुरळीत करण्यासाठी कंत्राटी चालकांची भरती मोठय़ा प्रमाणावर करत असताना, त्यासोबत वाहकांचीही कमतरता महामंडळाला मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे. त्यामुळे एसटीतून निवृत्त झालेल्या वाहकांची पुन्हा भरती करण्याचा निर्णय महामंडळामार्फत घेतला गेला आहे. परंतु, एसटी महामंडळाने तूर्तास या भरती संदर्भात निकष ठरवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. हे वाहक कंत्राटी पद्धतीनेच घेणार की अन्य प्रकारे यावर निर्णय होणार आहे.
३१ तारखेपर्यंत कामावर रुजू होण्याचे सांगून देखील याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसून ८१ हजार कर्मचाऱ्यांपैकी अद्यापही ४७ हजार कर्मचारी संपात सहभागी आहेत. आतापर्यंत ७ हजाराहून अधिक चालक आणि ७ हजार ३४५ वाहक कामावर रुजू झाले असून, सुमारे ४० हजार चालक, वाहक अजूनही संपावर ठाम आहेत. त्यामुळे एसटीचे आर्थिक वेळापत्रक देखील कोलमडलेले असून जनतेला त्याचा नाहक फटका बसत आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मागच्या पाच महिन्यापासून बेमुदत संप पुकारला आहे. कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करण्यात यावे यासह अनेक मागण्यासाठी आंदोलन आहे. राज्य सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य देखील केल्या आहेत. पण कर्मचारी त्यांच्या मागण्यारती ठाम असल्याने अद्याप कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही. हा संप कधी मागे घेतला जाईल याची शाश्वती नसल्याने राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे.
रत्नागिरी आत्तापर्यंत ५२ जणांना नियुक्त केलं आहे. त्यांना कामावर घेताना एक वर्षाचा करार देखील केला आहे. विशेष म्हणजे ज्यांना कंत्राटी पद्धतीने घेतलं आहे. त्यांना दोन दिवसाचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. त्यानंतर हे कर्मचारी एसटीच्या सेवेसाठी कार्यरत होतील. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने कंत्राटी पद्धतीने भरती सुरू केली आहे.