एसटीच्या जुन्या आणि दहा लाख किमी पूर्ण झालेल्या गाड्या मोठ्या प्रमाणात भंगारात काढण्यात आल्या आहेत. यामध्ये शहरी बस वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा जास्त समावेश आहे. याचा एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम झाला असून, वारंवार फेऱ्या रद्द होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः शाळकरी मुलांचे यामुळे हाल होत आहेत. एसटीच्या या ढिसाळ नियोजनामुळे रत्नागिरी एसटी महामंडळाचा कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. जिल्ह्यातील एसटीच्या अनेक बसफेऱ्या अचानक रद्द होत असल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही त्यामुळे तासनतास बसस्थानकावर थांबून राहिल्यानंतर बस रद्द झाल्याचे समजते. यामुळे प्रवाशांमध्ये एसटी महामंडळाच्या कारभाराबद्दल संतापाची लाट आहे. सर्वांत जास्त गैरसोय शाळकरी विद्यार्थ्यांची होत आहे. शाळेच्या वेळेतील अनेक महत्त्वाच्या फेऱ्या अचानक रद्द केल्या जात आहेत.
सकाळी शाळेत जाण्यासाठी किंवा सायंकाळी शाळेतून घरी परतण्यासाठी विद्यार्थ्यांना बस मिळत नाही. रत्नागिरी शहरातील शाळांमधून ग्रामीण भागात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सायंकाळच्या वेळेत मोठी परवड होते. वेळेवर बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पायी जावे लागते किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे. बसफेऱ्या रद्द होण्यामागचे कारण विचारले असता ‘बसगाड्या कमी असल्यामुळे’ फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत, असे अधिकारी सांगत आहेत. अनेक जुन्या गाड्या त्यांचे वयोमर्यादा संपल्याने भंगारात काढण्यात आल्या आहेत किंवा दुरुस्तीअभावी डेपोत उभ्या आहेत. यामुळे आवश्यक तेवढ्या गाड्या उपलब्ध होत नसल्याने एसटीचे दैनंदिन वेळापत्रक पुरते कोलमडले आहे.
स्मार्ट’ स्थानक, ‘गोंधळलेला’ कारभार – एकीकडे रत्नागिरी बसस्थानकाला स्मार्ट बसस्थानकाचे स्वरूप देण्यात आले आहे तर दुसरीकडे येथील बसफेऱ्यांचा कारभार मात्र गोंधळलेला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बनवलेले हे स्थानक आता गोंधळाचे केंद्र बनले आहे. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन भंगारात काढलेल्या गाड्यांच्या जागी नवीन गाड्या तातडीने उपलब्ध कराव्यात आणि प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवासी आणि पालकवर्गाकडून जोर धरत आहे.