राज्यातील मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही मिटण्याचं नाव घेत नाही आहे. काही कर्मचारी कामावर रूजू झाले असले तरी बहुतांश कर्मचारी विलनिकरणाच्या मागणीसाठी अद्यापही आंदोलनावर ठाम बसले आहेत. त्यामुळेच एसटी महामंडळाने अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबन, तथा बडतर्फ करण्याची कारवाई सुरु केली आहे. याबाबत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्वतः आकडेवारी माध्यमांसमोर ठेवली आहे. त्याचप्रमाणे बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेता येत नाही, असं नमूद करत संपावर ठाम असणाऱ्या कामगारांना सूचक इशाराच दिला आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, संप सुरू झाला तेव्हा पटावर ९२ हजार कर्मचारी दिसत होते. त्यानंतर रोजंदारीवर असलेल्या २००० लोकांची सेवा समाप्ती करण्यात आली. १३ जानेवारी पर्यंत ३१०० कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाले आहेत. साधारणतः या काळात संप केल्याने आणि इतर काही कारणाने आम्हाला ५००० कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त कराव्या लागल्या आहेत. साधारणतः ८७ ते ८८ हजार कर्मचारी पटावर आहेत. यापैकी २६ हजार ५०० कर्मचारी आता कामावर हजर आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल २४ कर्मचार्यांना शुक्रवारी बडतर्फ करण्यात आले. रत्नागिरी एसटी विभागात आता १२ टक्के एसटी वाहतूक सुरू असून येत्या सोमवारपर्यंत या फेर्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ६९९ कर्मचारी हजर झाले आहेत. हळूहळू कर्मचारी संख्या वाढेल, असा विश्वास रत्नागिरी एसटी विभागाने व्यक्त केला आहे. कोल्हापूर मार्गावर जिल्ह्यातून ५ गाड्या दररोज सुरू आहे. देवरूख, रत्नागिरी, राजापूर बसस्थानकातून कोल्हापूर गाड्या सुटत आहेत. २३८ चालक वाहक हजर झालेले आहेत.