शहरात मोकाट जनावरांचा वावर काही प्रमाणात कमी झाला असला तरी भटक्या श्वानांच्या दहशतीमुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. मार्गात येणाऱ्या झुंडीमुळे जाणेही अवघड होत आहे. वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असून, या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यासाठी नगरपालिकेने शहरात निर्बीजीकरण मोहीम हाती घ्यावी, असा पर्याय नागरिकांकडून सुचवण्यात आला आहे. शहरात भटक्या श्वानांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुख्य बाजारपेठेसह गजबजणाऱ्या रस्त्यावरून मोकाट श्वानांच्या झुंडीच्या झुंडी येत असल्याने पादचाऱ्यांसह व्यापारीही भयभीत झाले आहेत.
या श्वानांच्या वाढत्या संचाराने लहान मुलांना बाहेर पाठवण्यास पालक धजावत नाहीत. शहरातील कोकणनगर, उद्यमनगर, नाचणे रोड परिसरात मोकाट श्वानांचा सर्वाधिक वावर आहे. एकीकडे शहरात मोकाट श्वानांचा वावर वाढलेला असतानाही नगर पालिका प्रशासन त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलीच ठोस उपाययोजना राबवत नसल्याने नागरिकांची धास्ती कायम आहे. काही महिन्यांपूर्वी नगरपालिका प्रशासनाने श्वानांच्या निर्बोजीकरणाची मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम पुन्हा राबविण्याची मागणी करण्यात येत आहे.
कोकणनगर, चर्मालय, उद्यमनगर, अभ्युदयनगर, नाचणे पॉवर हाऊस, ओसवालनगर, खडपेवठार, आठवडा बाजार या परिसरामध्ये मोकाट श्वान दुचाकी, रिक्षांचा रात्रीच्यावेळी पाठलाग करतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे तसेच अनेक ठिकाणी लहान मुले, पादचाऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रकारही सुरू आहेत. मोकाट श्वानांना रात्रीच्यावेळी रस्त्यावरच काहीजणांकडून खाद्यपदार्थ टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हे श्वान विशिष्ट वेळेत त्या ठिकाणी झुंडीने जमा होतात. हेच श्वान दुचाकीस्वारांच्या किंवा नागरिकांचा पाठलाग करताना दिसतात. याबाबत वारंवार तक्रारी करूनही श्वानांना खाद्यपदार्थ टाकण्याचे प्रकार कमी झालेले नाहीत. मोकाट जनावरांना खाद्यपदार्थ टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.