तालुक्यातील गेल्या काही वर्षांपासून देव येथे कोळसा भट्टया धगधगत आहेत. अखेर याप्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन ठिकाणी छापा टाकून कोळसा भट्टया उद्ध्वस्त केल्या आहेत. यातून टेरव हे कोळसा भट्टयांचे माहेरघर असल्याचे उघड झाले आहे. कोळसा भट्टीवर विभागाची बंदी आहे. तरीही काही महिन्यांपासून टेव येथे कोळसा भट्टी धगधगत असल्याची चर्चा होती. त्यातच आता टेरव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर कोळसा भट्टयांवर कारवाई झाल्याचे दिसून येत आहे. सोमनवारी (ता. २०) व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यां मौजे टेरव येथील क्षेत्रीय फिरती दौरा असताना वेतकोंढ पाण्याची टाकी परिसरात डोंगरभागात विनापरवाना झाडतोड केलेबाबत व त्यापासून अंदाजे ६.५०० घनमीटर इतका तयार केलेला लाकूडमाल हा कोळसा भट्टीसाठी रचून ठेवल्याचे निदर्शनास आले.
याबाबत स्थानिक चौकशी केली असता ही तोड नागेश यशवंत कदम यांनी केल्याचे समजले. चौकशीसाठी त्यांना टेरव गावचे पोलिस पाटील श्री. मोहिते यांच्यामार्फत बोलावले. चौकशीदरम्यान नागेश यशवंत कदम यांनी केलेला गुन्हा निष्पन्न झाला. तोड झालेल्या क्षेत्रातील विखुरलेला लाकूडमाल जप्त केला असून कोळसा भट्टीसाठी रचून ठेवलेला लाकूडमालाचे भट्टीपासून विलगीकरण केले आहे. यानंतर मौटे टेरवपैकी दत्तवाडी अंतर्गत रस्त्याच्या पूर्वेकडील वराटी या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागामध्ये फिरती दरम्यान वरील प्रमाणेच मालकी क्षेत्रामधील वृक्षांची तोड करून तयार केलेल्या लाकूड मालाचे कोळशामध्ये रूपांतर करण्यासाठी रचून ठेवलेला लाकूड माल अंदाजे २३.५०० घनमीटर तर झाडतोड झालेल्या क्षेत्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपातील ५.५०० घनमीटर इतर लाकूडमाल जप्त केला.
या प्रकरणी अवैधरित्या केलेली वृक्षतोड व कोळसा भट्टीसाठी रचलेला लाकूडमाल हा संतोष राजाराम कदम (रा. टेरव) यांनी केल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले. मंगळवारी (ता. २१) मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मौजे टेरव गावच्या पूर्व दिशेस म्हसोबाचा माळ या ठिकाणी वनपाल चिपळूण, वनरक्षक कोळकेवाडी, वनरक्षक रामपूर, वनरक्षक तपासणी नाका पोफळी आणि टेरव गावचे पोलिसपाटील यांनी फिरती केली असता दोन कोळसा भट्टी लावल्याचे आढळले. ही कोळसाभट्टी ही प्रमोद चंद्रकांत मोहिते (रा. टेरव) यांनी लावली होती व ते तेथेच हजर होते.
कारवाईमध्ये चिपळूण परिमंडळाचे वनपाल दौलत रा. भोसले, वनरक्षक राहुल गुंठे, वनरक्षक राजाराम रा. शिंदे, वनरक्षक वनउपज तपासणी नाका कृष्णा द. इरमले आणि टेरवचे पोलिस पाटील श्री. माहिते यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तिघाही संशयितांविरोधात गुन्हे नोंद केले आहेत. ही कारवाई ही रत्नागिरी वन विभागाचे विभागीय वन अधिकारी दीपक पो. खाडे, सहाय्यक वनसरंक्षक वैभव सा. बोराटे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी , राजेश्री चं. कीर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.