रत्नागिरी जिल्ह्यामध्येही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेखातर नगर परिषदेने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची २ स्वतंत्र पथके तयार केली आहेत. या पथकाच्या सोयीसाठी वेगळ्या वाहनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, शहरातील माळनाक्याच्या वरचा भाग आणि तेथून खालचा भाग असे दोन विभाग करून निर्जंतुकीकरण या दोन पथकांद्वारे करण्यात येणार असल्याचे रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
खास कोविड रूग्णांसाठी निर्माण केलेले शहरातील महिला रुग्णालयामध्ये सुद्धा जागा शिल्लक नसल्याने नगर परिषदेच्या रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी बेडची व्यवस्था केली जाणार आहे. ज्या बिल्डींग अथवा गृहनिर्माण सोसायटीमध्ये कोरोनाचे रुग्ण असतील व त्या परिसराचे निर्जंतुकीकरण करावयाचे असेल त्यासाठी नागरिकांनी नगरपरिषदेच्या ०२३५२-२२३५७६ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी केले आहे. तसेच निर्जंतुकीकरण करणाऱ्या टीमकडून प्रशासकीय कार्यालय, बँक, हॉटेल, जिल्हा रुग्णालय यांमधूनही फवारणी केली जाणार आहे.
तसेच विनामास्क फिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पाचशे रुपये दंड वसूल करून त्या व्यक्तीला मास्क दिला जाणार आहे. शहरांमध्ये अनेक ठिकाणी बांधकाम सुरु आहेत, तेथे अनेक परराज्यातील कामगार काम करत आहेत, त्यांना देखील कामाच्या वेळी मास्क परिधान करणे अनिवार्य आहे, अन्यथा कडक कार्यवाहीला सामोरे जावे लागेल.
शहरातील चार्मालय स्मशानभूमीमध्ये कोरोन रुग्णांसाठी जागा राखीव ठेवण्यात आली असून, तेथे शवदाहिनीची क्षमता वाढविण्यात आली असून, तासाला एका शवाचे तेथे दहन केले जाणार आहे. कोरोना ही अशी महामारी आहे ज्यामध्ये स्वत: काळजी घेणे अत्यावश्यक बनले आहे.