केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. या बैठकीसंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट माहिती दिली कि, महाराष्ट्रानं आता पर्यंत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जेवढी केंद्रीय पथकं आली, त्यांनी दिलेल्या सुचना, नियमांचं, निर्बंधांच आणि आयसीएमआरच्या गाईडलाईन्सचं तंतोतंत पालन केल्याचं आरोग्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत सांगितले. अनेक पक्षांचा विरोध पत्करून महाराष्ट्रानं अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. राज्याने केंद्राच्या सर्व अपेक्षा पूर्णत्वाला नेल्या आहेत. प्रकाश जावडेकरांनी सोशल मिडीयावर ट्वीट करुन सांगितलं आहे की, 6 लाख लसीकरण करा, केंद्राकडून डोस पुरवले जातील. सध्या राज्यामध्ये दररोज साडेचार लाख लोकांचं लसीकरण केलं जातं आहे, परंतु, लसीच्या तुटवड्यामुळे अनेक केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. लस घेण्यासाठी आलेल्या लोकांना लस शिल्लक नसल्याने परत घरी पाठवावं लागत आहे. आम्ही पूर्वीपासून हिच मागणी करत आहोत की, लसीचा पुरवठा आम्हाला जेवढ्या लवकर करता येईल तेवढा करा आणि आमच्या गतीनं करा. जेणेकरून अधिक वेगानं आणि उत्कृष्टरित्या लसीकरण मोहीम राबविणे आम्हाला शक्य होईल.
आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये निव्वळ 14 लाख इतकेच लसींचे डोस शिल्लक राहिले असून हा साठा फक्त तीन दिवस पुरेल अशी चिंता व्यक्त करताना राजेश टोपे यांनी दर आठवड्याला किमान आवश्यक असणाऱ्या 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. महाराष्ट्रात लसीचे 14 लाख डोस शिल्लक असून ही लस जेमतेम तीन दिवसांकरिता पुरू शकते. हे शिल्लक डोस पाच लाखांच्या तुलनेत तीन दिवसांमध्ये संपतील आणि महाराष्ट्रामधील लसीकरण जर वेळेत लस नाही उपलब्ध झाली तर बंद होण्याची शक्यता आहे. म्हणूनच दर आठवड्याला किमान 40 लाख लसींचा पुरवठा करणे गरजेचे आहे. आज लसिकरणात आम्ही साडेचार ते पाच लाखांपर्यंत पोहोचलो आहोत. येत्या दोन दिवसांत दिवसाला सहा लाखांपर्यंत जाण्याचे लक्ष आम्ही ठेवले असून ते पूर्ण करण्याची हमी मी देतो. असंही त्यांनी सांगितले. केंद्र सरकार लसीचा पुरवठा करत नाही असं आमचे म्हणणे नाही पण मागणीपेक्षा वेग नक्कीच कमी आहे. ज्या पद्धतीने आव्हानात्मक तोंडी बोललं जातं त्यापद्धतीने कृतीत घडतंच असे नाही हे माझे केंद्र सरकारला सांगणं आहे. अशी तक्रारवजा टीकाही राजेश टोपे यांनी केली.
सर्वात जास्त कोरोना होणाऱ्यांमध्ये आणि बाहेर फिरणाऱ्यांमध्ये तरुणाईचा समावेश जास्त आहे. 20 ते 40 वयोगटातील लोकांचा सहभाग यामध्ये अधिक प्रमाणात आहे. यामुळे या वयोगटातील तरुणाईचे होणारं इंफेक्शन कमी करण्यासाठी लवकरच 18 वर्षापुढील वयोगटातील सर्वांचं लसीकरण लवकरात लवकर करणे ही काळाची गरज आणि मागणी आहे. पहिलं राज्यातील तरुण तरुणींना सुरक्षित करायचं आहे, एकवेळ इतर ठिकाणी उशीर करा. त्यामुळे लवकर परवानगी द्या मागणीही केली आहे.” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.