कोकण रेल्वेमार्गावरील राजापूर रोड आणि सौंदळ येथील थांब्यावर कोकण रेल्वेच्या तुतारी एक्स्प्रेसह अन्य एक्स्प्रेस गाड्यांनाही अतिरिक्त थांबा मिळावा, अशी मागणी वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने कोकण रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. ही माहिती प्रवासी संघटनेचे सचिव यशवंत जड्यार यांनी दिली. रेल्वेगाड्यांच्या थांब्याबाबतचे निवेदन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी यांनाही देण्यात आले आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावे देशातील विविध भागांना जोडली गेली आहेत. येथील लोकांचा प्रवासही अधिक सुलभ झालेला आहे.
राजापूर रोड आणि सौंदळ या रेल्वेस्थानकावर अनेक गाड्यांना अद्यापही थांबे मिळत नसल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसतो. याकडे वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने लक्ष वेधले आहे. या गाड्यांच्या अतिरिक्त थांब्याच्या मागण्यांसह सौंदळ येथील रेल्वेस्थानकावर सुलभ शौचालय, सुसज्ज तिकीट खिडकी, प्लॅटफॉर्म आदी मुलभूत सुविधा उभारल्या पाहिजेत, अशी मागणी केली आहे. सध्या राजापूर रोड आणि सौंदळ येथे दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा मिळतो.
या रेल्वेगाड्यांना हवा थांबा – नेत्रावती एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मंगळूर एक्स्प्रेस, ओखा एर्नाकुलम एक्स्प्रेस, भावनगर कोचुवेल्ली एक्स्प्रेस, गांधीधाम नागरकोईल एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक मडगाव एक्स्प्रेस, हापा एक्स्प्रेस या रेल्वेगाड्याना थांबा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.