मुंबई-पुणे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील खोपोली बायपासजवळ गुरूवारी एक विचित्र अपघात झाला. पुणे येथून मुंबईस जाणाऱ्या ट्रकने पुढे जाणाऱ्या १२ वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात १२ वाहनांची दामटी झाली, ६ जण किरकोळ जखमी झाले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात इतका विचित्र घडला की, एक चारचाकी तर दुसऱ्या वाहनावर चढून अक्षरशः उभी राहिली.या अपघातात एक नवी नवरीही जखमी झाली आहे. जखमींना खोपोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
१२ वाहनांचा दामटा – याबाबत अधिक वृत्त असे की, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली बाह्यवळणावर हा अपघात गुरूवारी दुपारी १ वा.च्या सुमारास घडला. तब्बल १२ वाहने एकमेकांवर धडकली. हा अपघात नेमका कसा झाला, याचा अद्याप उलगडा झालेला नसला तरी अचानक झालेल्या या अपघातामुळे बाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वाहतूक ठप्प – या अपघातानंतर १ तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहनांत अडकलेल्या वाहनचालक व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले.
सारी अलिशान वाहने – गुरुवारी दुपारी १२.५५ वा. चे सुमारास किमी. ३९ जवळ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात मुंबई-पुणे लेन येथे ट्रक हा अनियंत्रित झाला, आणि त्यापुढील कारवर इतक्या जोराने धडकला की त्यामध्ये २) कार, ३) कार, ४) टोयाटो, ५) वॅगनार, ६) ईर्टिका, ७) कार, ८) अल्टो, ९) कार, १०) कार, ११) स्कोडा, १२) ईर्टिका अशा वाहनांचा अक्षरशः दामटा झाला.
सहा जण जखमी – या घटनेत ६ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून ११ वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये कुंदा सोनवणे (वय- ६० रा.ठाणे), कमल सोनवणे (वय ३८ रा ठाणे), हर्षद घानेतकर – वय २५ रा पुणे), सदानंद भोईर (वय ४५ रा ठाणे), मंथू थॉमस (वय ८० रा पुणे), इल्लेयमा इशू (वय ६२ रा पुणे) हे जखमी झाले आहेत. जखमींना खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यासाठी हलविण्यात आले.
ट्रकचालक पसार – अपघातानंतर ट्रकवरील चालक पळून गेला आहे. अपघातामधील वाहने आयआरबीकडील हायड्राच्या साह्याने रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेत मुंबई लेनवर अपघातग्रस्त वाहनांतील तेल मार्गावर पडल्याने वाहनं घसरुन अनर्थ होऊ नये यासाठी माती टाकून निसरडा होणार नाही याची दक्षता घेण्यात आली.