राजापूर तालुक्यासह कोकणात चर्चेत ठरलेला रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत ऐरणीवर आला होता. रिफायनरीच्या मुद्द्यावरून प्रकल्प विरोधकांनी महाविकास आघाडीला साथ देण्याची भूमिका घेतली; मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारे महायुतीतील भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे बारसू- सोलगाव परिसरातील बहुचर्चित रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीला वेग येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
नाणार अन् बारसू-सोलगाव परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प चर्चेत आहे. या प्रस्तावित प्रकल्पांवरून राजकीय पक्षांमध्ये जशी मतमतांतरे आहेत त्याप्रमाणे समर्थक आणि विरोधक अशी भूमिका घेणारा वर्गही आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प परिसरातील समर्थक एकत्र आले होते. त्यांच्या बैठकीत रिफायनरी प्रकल्प उभारणीचा पुन्हा एकदा नारा दिला होता. त्याचवेळी रिफायनरी विरोधकांनी संपर्क अभियानाच्या माध्यमातून रिफायनरीविरोधात शड्डू ठोकले.
यामध्ये विरोधकांची साथ महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना मिळाली होती. महायुतीचे उमेदवार राणे यांनी निवडणुकीत बाजी मारली. त्यांच्यासह भाजपने कोकणच्या विकासाच्या मुद्द्यावरून रिफायनरीचे सातत्याने समर्थन केले आहे. त्यामुळे गेल्या दशकभरापासून जर-तरच्या हिंदोळ्यात अडकलेल्या रिफायनरी प्रकल्पाची उभारणीला गती येईल, अशी अपेक्षा रिफायनरी समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे.