23.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरेशन दुकानदारांचा संप तुर्त मिटला

रेशन दुकानदारांचा संप तुर्त मिटला

गेले अनेक वर्षे रास्त धान्य दुकानदारांच्या विविध समस्या आहेत.

रेशन दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांसह नादुरुस्त झालेल्या ‘ई- पॉस’ मशीन नव्याने मिळाव्यात, या मागणीसाठी जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी ‘ई पॉस मशीन’ बंद आंदोलन १ जानेवारीपासून पुकारले होते. एका अर्थाने हे कामबंद आंदोलन होते. त्यामुळे जिल्हाभरातील धान्य वितरण ठप्प झाले होती. दरम्यान, गुरुवारी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत रेशन दुकानदारांच्या प्रलंबित प्रश्नांबरोबरच ‘ई-पॉस’ मशिन संदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवून फेब्रुवारी अखेर योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही दिल्याने तसेच मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर रेशनकार्ड धारकांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने शुक्रवारी चिपळूणमध्ये संघटनेच्या  तातडीच्या झालेल्या बैठकीत ‘ई-पॉस’ मशीन बंद आंदोलन स्थगित केल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा रेशन दुकानदार केरोसीन चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी दिली.

गेले अनेक वर्षे रास्त धान्य दुकानदारांच्या विविध समस्या आहेत. त्याबाबत शासन स्तरावर सातत्याने म ागणी करुनही त्यामध्ये बदल झालेला नाही, राज्यामध्ये १ मे २०१८ पासून आधार संलग्न सार्वजनिक वितरण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असल्याने या प्रणालीचे कामकाज सुलभतेने व अधिक गतिमान होण्यासाठी सहा वर्षापूर्वी दिलेल्या व आता कालबाह्य झालेल्या २-जी ई-पॉस मशिन बदलून त्या केंद्र सरकारच्या १९ एप्रिल २०२१ रोजीच्या मार्गदर्शन तत्वानुसार नविन तंत्रज्ञानावर आधारित ५-जी ई-पॉस मशिन देण्यात याव्यात, तसेच अपवादात्मक परिस्थितीत पावती पध्दतीने होणारे धान्य वितरण या मशिनद्वारे ऑनलाईन करून घेण्यासाठी नव्याने सुधारित कार्यपध्दती विकसित करावी, यामध्ये कार्ड नॉमिनी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात यावी, दुकानदारांना प्रती क्विंटल १५० रूपये ऐवजी प्रति किंटल ३०० रूपये ‘कमिशन द्यावे, दुकानाचे व्यस्थापन करण्यासह इमारत, दुकान भाडे, वीज बिल, इंटरनेट, स्टेशनरी खर्चासाठी प्रति महिना किमान दोन ते पाच हजार रूपये इतकी रक्कम द्यावी आदी मागण्या आहेत.

मात्र, त्याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने या नादुरूस्त झालेल्या ई-पॉस मशिन जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी १ जानेवारीपासून प्रशासनाकडे जमा केल्या होत्या यामुळे जिल्ह्यातील रेशन धान्य वितरण व्यवस्था ठप्प झाली होती. दरम्यान, गुरुवारी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम, कोषाध्यक्ष रमेश राणे यांनी चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी रेशन दुकानदारांच्या प्रलंबित समस्यांसंह ‘ई-पॉस’ मशीन संदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवून फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत शासनाकडून आपल्यापर्यंत योग्य निर्णय मिळेल, अशी ग्वाही दिली.

यानुसार रेशन दुकानदार संघटनेची जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांच्या चिपळूण येथील निवासस्थानी तातडीची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. यानंतर १ जानेवारीपासून पुकारलेले ‘ई- पॉस’ मशीन बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी प्रशासनाकडे जमा केलेल्या ई- पॉस मशीन परत घेऊन धान्य वितरण व्यवस्था पूर्ववत करावी व मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने रेशन दुकानदारांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी केले आहे. यावेळी रेशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी तसेच तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular