चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार शेखर निकम यांना उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने उमेदवारी यादी जाहीर न करता थेट उमेदवारांच्या हातात निवडणुकीचा एबी फॉर्म दिला. त्यानुसार शेखर निकम यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म मिळाला. ही जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात आली. प्रशांत यादव यांचे नावाला शरद पवार यांच्याकडून पसंती देण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चिपळूणच्या जागेवर पाणी सोडावे लागणार असे चित्र आहे. शेखर निकम २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. निकम हे चिपळूण विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उतरत आहेत.
आचारसंहिता सुरू झाल्यापासून महायुतीची संयुक्तिक बैठक झालेली नाही. आता निकम यांना एबी फॉर्म मिळाल्यामुळे बुधवारी (ता. २३) महायुतीची बैठक होणार आहे. त्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीचे नियोजन करण्यात येणार आहे. चिपळूणच्या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू होती. माजी आमदार सुभाष बने हे त्यांचे पुत्र रोहन बने यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून आले होते. रोहन बने यांनीही निवडणुकीची तयारी केली होती. काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन प्रशांत यादव हे राष्ट्रवादीत दाखल झाले आणि माजी आमदार रमेश कदम यांच्या मदतीने त्यांनी विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली. माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ते तळागाळापर्यंत पोहोचले. शरद पवारांनी आज राज्यातील २१ उमेदवारांची यादी जाहीर केली.
शिंदे सर्मथकांमध्ये नाराजी – चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन आमदार सदानंद चव्हाण यांचा पराभव करीत आमदार निकम यांनी विजय मिळवला होता. माजी आमदार सदानंद चव्हाण हे सध्या शिवसेना शिंदे गटात सक्रिय आहेत. सदानंद चव्हाण यांनीही सध्याची निवडणूक लढवावी, असा सूर शिंदे शिवसेनील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्यातून उमटत आहे, मात्र आजच शेखर निकम यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अधिकृत नावाची घोषणा न करता एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे शिंदे सर्मथकांमध्ये नाराजी पाहावयास मिळत आहे.