कोकणातील अनेक तरुण-तरुणी कामानिमित्त परदेशात आहेत. त्यांच्या नातेवाईकांना कोकणी पदार्थ किंवा अन्य वस्तू परदेशात पाठविण्यासाठी खासगी यंत्रणांची मदत घ्यावी लागत होती. त्यात आर्थिक भुर्दंडही ग्राहकांना सहन करावा लागतो. त्यासाठी यंदा दिवाळीच्या मुहर्तावर पोस्ट विभागाने कमी दरात फराळ परदेशात पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गतवर्षी आंब्यावरील प्रक्रिया पदार्थ पाठविण्यासाठी केंद्र सुरू केले होते. कोकणात दिवाळी सण मोठ्या थाटात साजरा केला जातो. दिवाळीच्या कालावधीत विविध पदार्थ तयार केले जातात. ते पदार्थ नातेवाइकांना दिले जातात. जिल्ह्यातील अनेक नागरिक कामानिमित्त बाहेरगावी किंवा परदेशात जातात. त्यांना दिवाळीत घरचा फराळ मिळावा, यासाठी पोस्ट ऑफिसमार्फत परदेशात फराळ पाठविण्याची योजना सुरू केली आहे.
घरातील व्यक्तींना व नातेवाइकांना दिवाळीचा फराळ परदेशात मिळावा याकरिता पार्सल पाठविण्यासाठी सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे. रत्नागिरी डाक विभागामार्फत रत्नागिरी प्रधान डाकघर व चिपळूण प्रधान डाकघर येथे पॅकिंगची देखील सुविधा करण्यात आली आहे. फराळ परदेशात पाठवण्यासाठी पार्सलचे दर १० किलोचे दरही निश्चित केलेले आहेत. देशनिहाय ऑस्ट्रेलिया ११ हजार ९१२ रुपये, कॅनडा ९ हजार ६७६ रुपये, अमेरिका ९ हजार ५१ रुपये, यु.ए.ई. ३ हजार ४९३ रुपये, रशिया ६ हजार ७५० रुपये, यु.के. ६ हजार ४६१ रुपये, जपान ४ हजार ७९७ रुपये दर ठेवण्यात आलेला आहे. पोस्ट विभागाकडून सुरू केलेल्या या सुविधेचा अनेक लोकांकडून फायदा घेतला जात आहे.