ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेले गोवळकोट धक्का येथील मैदानाच्या ठिकाणी वाळूचा डेपो प्रस्तावित आहे. प्रशासनाने तसा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठवला आहे; परंतु या प्रस्तावामुळे मैदानाअभावी परिसरातील तीन शाळांमधील सुमारे ८०० हून अधिक विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. मुलांना जवळपास उपलब्ध नसल्याने प्रशासनाच्या या प्रस्तावाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध होत आहे. प्रशासनाने हा प्रस्ताव तातडीने रद्द करून पर्यायी जागेचा विचार न केल्यास ग्रामस्थ व शैक्षणिक संस्था आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहेत. शहरातील गोवळकोट धक्का येथील मैदानाव्यतिरिक्त परिसरात अन्य खेळाचे मैदान उपलब्ध नाही. या मैदानात शंभर ते दीडशे विद्यार्थी नियमित खेळाचा सराव करत असतात.
त्यातून तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय खेळाडू येथे घडले आहेत. क्रिकेट, कबड्डी, खो-खोसारख्या मैदानी खेळांचा सराव सुरू असतो. येथे जिल्हाभरातून खेळाडू येत असतात. माजी कसोटीपटू गुलाम परकार, जुल्फी परकार, शहाबुद्दीन गोठे, वसिम जाफर, आदिनाथ पाटील, विकी नरळकर, नीलेश देसाई, नंदू कांबळी आदी खेळाडूंनी या मैदानात चुणूक दाखवली आहे; मात्र आता महसुलापोटी हे मैदान इतिहासजमा करण्याचा विचार केला जात आहे. या मैदानालगत खदिजा इंग्लिश स्कूल, खातून अब्दुल सेकंडरी स्कूल, जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा व भोईवाडी मराठी प्राथमिक शाळा आहेत.
या शाळांमधील ८०० हून अधिक विद्यार्थी या मैदानाचा लाभ आजही घेत आहेत. या शाळांमधील वार्षिक क्रीडा स्पर्धा, १५ ऑगस्ट व २६ जानेवारीनिमित्ताने ध्वजवंदन व विविध कार्यक्रम होतात. हे क्रीडांगण शासनाने शैक्षणिक संस्थांकडे वर्ग करावे, अशी मागणी अनेक वर्षे केली जात आहे. पालिकेने या गरजेकडे लक्ष न दिल्याने मैदानाबाबतची समस्या गंभीर आहे. पालिकेचे नवीन मैदान गावच्या सिमेवर असल्याने त्याचा फारसा उपयोग होत नाही. येथी दाट वस्ती व अरुंद रस्त्यामुळे वाळूडेपो त्रासदायक ठरणार असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शासनाच्या या प्रस्तावाला कोणत्याही स्थितीत विरोध करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.