रत्नागिरी शहरात दूधामध्ये भेसळ करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास अन्न औषध प्रशासनाला यश आले आहे. ही दूध भेसळ प्रत्यक्ष होत असताना रत्नागिरी जिल्ह्याचे अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. मोठ्या प्रमाणात दूध संकलन आणि वितरण यावर होणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन अन्न औषध प्रशासनाकडून या व्यवसायावर करडी नजर ठेवण्यात आली होती. अखेर मारूती मंदिर, परटवणे आदीसह अनेक ठिकाणी पहाटेच्या वेळी येणारे दूध आणि होणारे वितरण याचे व्हिडीओ रेकॉडींग करत ही कारवाई करण्यात करण्यात आली. रत्नागिरी शहरात हजारो लीटर म्हैशीचे दूध ग्रामीण भागातून येते आणि त्याचे वितरण केले जाते, असा आभास याठिकाणी गेले ५ ते ६ वर्षे निर्माण केला जात होता. राज्यात दूध भेसळीवर महाराष्ट्र शासनाने कठोर पाऊले उचलत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्व अन्न औषध प्रशासनाला दिले होते. गेले अनेक वर्षे ग्रामीण भागातून रत्नागिरी शहरात ८ ते १० जणांचे टोळके सकाळी दूधाच्या किटल्या घेऊन संबंधित ठिकाणी येऊन एखाद्या टपरीवर किंवा झाडाच्या बाजूला घाटमाथ्यावरून येणारे गायीचे दूध घेऊन त्यामध्ये भेसळ करून शहरातील नागरिकांना म्हैशीचे दूध म्हणून वितरीत करत होते.
हे दूध वितरीत करताना स्थानिक गवळ्यांचा आधार घेतला जात होता. एखाद्या गाडीला २०-२० लीटरच्या चार-चार किटल्या बांधून ते शहरात गावठी दूध म्हणून वितरित करण्यात येत होते. जसा ग्राहक मिळेल त्याप्रमाणे कोणाला गायीचे तर कोणाला म्हैशीचे दूध म्हणून दूधाचे वितरण केले जात होते. वितरण करताना हे दूध थंड असल्याचा ग्राहकांना संशय येत होता. परंतु येणारा दुध विक्रेता ग्रामीण भागातून येत असल्याने त्यावर विशेष कोणी लक्ष देत नव्हते. अनेक वेळा हे दूध आजारी रुग्ण, लहान बालके यांना वितरीत केले जात असे. यासंबंधी गुप्त माहिती मिळताच अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी स्वतः यावर लक्ष केंद्रीत केले व व्हिडीओ शुटींगच्या माध्यमातून ही दूध भेसळ करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. रत्नागिरी शहरातील मारूतीमंदिर येथे एकाच टपरीमध्ये अनेक गवळी दुचाकीवरून एक-एक करत येऊन रिकाम्या दूधाच्या किटल्या भरून ते दूध ग्राहकांना म्हैशीचे दूध म्हणून विकत होते.
तसेच या टपरीच्या मागील बाजूने प्लास्टिकच्या फोडलेल्या दूध पिशव्या पाठच्या पाठी लंपास केल्या जात होत्या. जेणेकरून या सगळ्या प्रकरणाचा कोणालाही संशय येणार नाही. हा प्रकार अनेक वर्षे सुरू होता. पाचशे ते सहाशे लीटर दूध हे विक्रेते एका तासात संपवून आपापल्या घरी निघून जात व दुसऱ्या दिवशीचे बुकींग करून ठेवत. यामध्ये प्रत्येकाचे विभाग वाटलेले होते. कुठलाही गवळी दुसऱ्याच्या विभागात जाऊन दूध विकत नव्हता. तर त्याठिकाणी दूध विकणाऱ्याचा नंबर दिला जात होता. याचप्रमाणे उद्यमनगर येथेही कारवाई करण्यात आली असून याच पद्धतीने गायीचे दूध म्हैशीचे दूध म्हणून विकणाऱ्या एका विक्रेत्यावर कारवाई करत १६ हजार रूपये दंड करण्यात आला. दरम्यानं संबंधितांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.