मुंबईतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेले आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर सयाजी मोरे यांचा मृतदेह घाटकोपर येथील रेल्वे रुळावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे हा आत्मघात आहे की घातपात असा सवाल उपस्थित होतो आहे. प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुधीर मोरे यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर मिळाला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
नेमकं काय घडलं? – सुधीर मोरे यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या विभागात सुधीर मोरे यांची ओळख एक खंबीर नेता म्हणून होती. ‘अरे ला कारे’ करण्याची धमक असणाऱ्या शिवसैनिकांपैकी ते एक होते. त्यामुळे सुधीर मोरे यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले असेल यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. सुधीर मोरे यांच्या काही निकटवर्तीयांच्या मते गेल्या काही दिवसांपासून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते. याच दबावातून त्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असावे असा निकटवर्तीयांचा अंदाज आहे. कदाचित ब्लॅकमेल करणाऱ्यांनी त्यांचा घातपातही घडवून आणला असण्याची शक्यता सुधीर मोरे यांना ओळखणाऱ्या अनेकांनी व्यक्त केली आहे.
फोन आला आणि… – सुत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुधीर मोरे यांना एक फोन आला. यानंतर सुधीर मोरे यांनी मी एका वैयक्तिक कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगितले. ते अंगरक्षकांना सोबत न घेताच घराबाहेर पडले. त्यांनी नेहम श्रीप्रमाणे स्वतःच्या गाडीने प्रवास करणे टाळले. ते रिक्षाने घाटकोपरला गेले.. यानंतर सुधीर मोरे ट्रॅकवरुन चालत घाटकोपर आणि विद्याविहार या दोन स्थानकांमध्ये असलेल्या पुलाखाली गेले. एक लोकल ट्रेन कल्याणवरुन सीएसएमटीच्या दिशेने जात होती. या रेल्वेखाली त्यांनी स्वतःला झोकून दिले असावे असा कयास वर्तविण्यात येतो आहे. मोटरमनने कोणीतरी ट्रॅकवर झोपल्याच् पाहून वेग कमी करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, ट्रेन वेगात असल्याने सुधीर मोरे यांच्या अंगावरुन गेली आणि त्यांच्या शरीराचे तुकडे होऊ त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शिवसेनेचा पराभव होवू दिला नाही – सुधीर मोरे यांनी विक्रोळी पार्कसाईट परिसरातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. शिवसेनेच्या तिकीटावर ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी पार्कसाईट विभागात एकदाही शिवसेनेचा पराभव होऊन दिला नाही. कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे आणि मराठा जनसंपर्क या सुधीर मोरे यांच्या नेतृत्त्वाच्या जमेच्या बाजू होत्या. पालिकेच्या या प्रभागात शेवटपर्यंत त्यांचे वर्चस्व कायम होते.
ठाकरेंवर निष्ठा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर सुधीर मोरे हे उद्धव ठाकरे गटाबरोबर कायम होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ते जवळचे म्हणून ओळखले जात. शिवसेना नेतृत्त्वाकडून त्यांच्यावर विभाप्रमुख, संपर्कप्रमुख अशा अनेक जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्या होत्या. सध्या ते रत्नागिरीचे संपर्कप्रम ख होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काम वाढवण्यासाठी त्यांचा अनेकदा रत्नागिरी जिल्ह्यात दौरा होत असे. अनेक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. यापूर्वी झालेल्या दापोली, मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या.
अंत्यसंस्कार – शुक्रवारी दुपारी २ वाजता विक्रोळीतील स्मशानभूमित सुधीर मोरेंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवेसैनिकांसह अन्य विविध पक्षातील नेतेमंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.