पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या जयंती उत्सवानिमित्त १८ डिसेंबरला रत्नागिरी ते पावस पदयात्रा काढण्यात येणार आहे. मागील वीस वर्षापासून ही पदयात्रा सुरु आहे. पहाटे ४.३० वा. जयस्तंभ येथून पदयात्रेला सुरवात होऊन पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात तिची सांगता होणार आहे.
स्वामींच्या पावस येथील वास्तव्याने रत्नागिरीकरांना नामस्मरणाची गोडी या पायी यात्रेने लागली आहे. मुखाने ओम रामकृष्ण हरी नामस्मरण करत पहाटेच्या धुंद वातावरणात शेकडो रत्नागिरीकर पदयात्रेत उस्फुर्तपणे सहभागी होतात. ज्ञानदेवांचा हरिपाठ गात पावसला जाण्याचा भक्तीमार्ग वर्षातून एकदा तरी अनुभवावा म्हणजे भक्तीनामाची गोडी काय असते ते या छोट्याशा वारीत अनुभवता येईल, असे आवाहन आयोजक अनंत आगाशे यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे काही किलोमीटर चालण्याने आपल्याला शारीरिक चाचणी देखील आजमावता येते. आपला संयम किती आहे हे तपासून बघता येते. ही काही चालण्याची स्पर्धा नव्हे; पण आपले आरोग्य किती चांगले आहे, श्वास किती खोलवर घेता येतो हे आजमावल्यामुळे आपल्या जगण्याला एक नवी उभारी येते, असे त्यांनी आवाहन केले.
सकाळच्या धुक्यामध्ये, थंड वातावरणामध्ये, सुमधुर संगीताच्या तालावर हरिपाठ गाणारी सर्व वारकरी मंडळी क्षणभरचा दोनदा विसावा ही या वारीची वैशिष्ट्ये. पावसला ९ वाजेपर्यंत वारी पोहोचते. त्यानंतर मंदिरासमोर फेर धरून नाचणे, अभंग सांगणे नंतर क्षीण घालवण्यासाठी अल्पोपाहार, ट्रक किंवा तत्सम वाहनाने रत्नागिरी येथे परतणे हे जीवनात एकदा तरी अनुभवावे. वारीत सहभागी होण्यासाठी सर्वांचा पांढरा वेश असावा, पुरुषांसाठी पांढरी टोपी बरोबर आवश्यक असून पाणी बाटली आणावी. अधिक माहितीसाठी राजन पटवर्धन किंवा अनंत आगाशे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.