जिल्ह्याच्या किनाऱ्यावर मोठ्याप्रमाणात एलईडी मच्छीमारी सुरु असते, आता पावसाळ्यातही अनेक ट्रॉलर्स मच्छीमारी करताना दिसून येत असून यावर मत्स्य व्यवसाय विभागाने लगाम घालावा अन्यथा या कार्यालयावर धडक द्यावी लागेल. असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना दिले. याचबरोबर जिल्ह्यातील अन्य प्रश्नांची निवेदने देऊन प्रशासनाचे लक्ष त्यांनी वेधून घेतले आहे. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात एलईडी मासेमारी होत असल्याच्या तक्रारी असून, त्यावर योग्य कारवाई होत नसल्याची माहिती पुढे आली आहे.
एलईडीला कायद्याच्या कोणत्याच चौकटीत परवानगी नाही. मत्स्य संवर्धन कालावधीतच एलईडी फिशिंग व ट्रॉलिंग फिशिंग होत असेल तर छोट्या मच्छीमारांनी करायचे काय, असा प्रश्न उपस्थित केला. एलईडीमुळे मासळी प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होऊन, पर्ससिनेट मच्छीमार मोठ्याप्रमाणात छोटी मासळी मारत आहेत. बंदीच्या कालवधीमध्येही काही ठिकाणी मच्छीमारी होत आहे. यावरही कडक कारवाई केली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त करताना त्याबाबतचे निवेदन अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना दिले.
मत्स्य व्यवसाय खात्याने याकडे दुर्लक्ष केल्यास, या कार्यालयावर धडक देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.. चिपळूण येथील पूररेषेबाबतही त्यांनी निवेदन दिलें. निळ्या व लाल रेषेबाबत नागरिकांमध्ये असणारा संभ्रम लवकरातलवकर मिटला पाहिजे. लाल रेष मारण्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली. चिपळुणातील गाळाचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्याप्रमाणात निधीची आवश्यकता असून, याबाबत योग्य सर्वे करुन त्याचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात यावा असेही त्यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये महाराष्ट्र सुरक्षा कामगार बोर्ड अंतर्गत १८ कर्मचारी कोरोना कालावधीपासून कामावर आहेत. या कामगारांना काढून आता नवीनं काम गार भरण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु असून, या कामगारांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. मात्र सिंधुदुर्गप्रमाणेच येथील कामगारांनाही काढून न टाकता त्यांना सेवेत कायम करावे अशी मागणी निवेदनाद्वारे माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.