26.1 C
Ratnagiri
Tuesday, September 17, 2024
HomeRatnagiriरेवस रेडी मार्गाला विरोध नाही.. काळबादेवी विशेष ग्रामसभेत ठराव

रेवस रेडी मार्गाला विरोध नाही.. काळबादेवी विशेष ग्रामसभेत ठराव

पीरदर्गा ते मयेकरवाडी आणि त्यापुढे सुरूबन ते आरे असा हा मार्ग नेण्यात यावा.

सागरी महामार्ग हा त्याच्या नावाप्रमाणे असायला नको का? पर्यटकांना समुद्राचा आनंद घेत प्रवास करायला नको का? असे सवाल करीत रेवस-रेडी सागरी महामार्गाचे काळबादेवी गावातील भूसंपादन हे घाईघाईने न करता गावच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला लागून पीरदर्गा ते आरे असे करण्यात यावे, असा एकमुखी ठराव काळबादेवी ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत केला आहे. दरम्यान, यावेळी विकासकामाला आमचा कधीही विरोध नव्हता आणि नसेल, अशी निःसंदीग्धं ग्वाहीही ग्रामस्थांनी दिली. रेवस-रेडी सागरी महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली असून काळबादेवी गावात काही दिवसांपूर्वी अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.

मात्र यावेळी ज्या भागातून हा रस्ता जाणार होता त्या भागातील अनेक घरे प्रभावित होत होती. त्याचवेळी ग्रामस्थांनी भूसंपादनाला विरोध केला होता. रेवस-रेडी महामार्ग आणि काळबादेवी-मिऱ्या खाडीपूलाला आमचा विरोध नाही, मात्र गावातील पारंपारिक घरे पाडून विकास आम्हाला नको आहे. धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला लागून म्हणजेच पीरदर्गा ते मयेकरवाडी आणि त्यापुढे सुरूबन ते आरे असा हा मार्ग नेण्यात यावा. जेणेकरून पर्यटनाला चालना मिळेल, असे ग्रामस्थांनी यावेळी आपापली मते

यावेळी झालेल्या ठरावाची प्रत जिल्हा नियोजन समिती, एम एसआरडीसी, आ. तथा पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम खाते यांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, यावेळी सरपंच सौ. तृप्ती पाटील यांनी यापूर्वी झालेल्या भूसंपादन प्रक्रियेत ग्रामपंचायतीला कोणत्याही अधिकाऱ्यांनी विश्वासात घेतले नसल्याचे सांगितले. या सभेला ७० ते ८० ग्रामस्थ उपस्थित होते. परंतु ७ पैकी ५. सदस्य गैरहजर होते. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

रेवस-रेडी हा मार्ग मुळात दुपदरी आणि चारपदरी असा आहे. रेवसपासून १६५ कि.मी. अंतरापर्यंत ४ पदरी तर त्यापुढे तो २ पदरी असणार आहे. त्यामुळे भूसंपादन करताना या बाबीचा विचार करण्यात यावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. या सभेला संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होणार होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते येऊ शकत नसल्याने भूसंपादन प्रक्रियेचे प्रेझेंटेशनबाबबत पुन्हा सभा घेण्यात येणार असल्याचे सरपंच यांनी पत्रकारांशी माहिती देताना सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular