उन्हाचा कडका वाढत असल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. जिल्ह्यात ३० गावांतील ९९ वाड्यांमधील २८ हजार १७३ लोक पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. टंचाईग्रस्तांना केवळ सात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी कमी पडलेला पाऊस आणि यंदा वाढलेले तापमान यामुळे पाणीसाठ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. वाढत्या उष्म्याचा परिणाम पाण्याच्या पातळीवर होत असल्याने पाणीटंचाईची गावे आणि वाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढलेल्या तापमानामुळे ग्रामीण भागातील विहिरी, विंधन विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यावर होत आहे.
लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यामध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. रत्नागिरीतील १३ हजार २४५, तर चिपळुणातील ९ हजार ५४७ लोकांना टंचाई भेडसावत आहे. या टंचाईग्रस्तांना केवळ दोन टँकरनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने त्यांना पाणी विकत घेण्यासाठी हजारो रुपये खर्च करावा लागत आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्हाभरात पाणी पुरवठा योजनांचे जाळे विणले जात आहे.
त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा योजनांवर खर्च करण्यात येऊनही जिल्ह्यातील लोकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एप्रिल महिन्याच्या पंधरवड्यामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवू लागलेली असल्याने लोकांचे हाल होत आहेत. मे महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विहिरी, विंधन विहिरी, तलावांची पातळी खालावली जाणार असून, पाणीटंचाईचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.