25.6 C
Ratnagiri
Tuesday, September 17, 2024

परप्रांतीय हायस्पिड ट्रॉलरच्या घुसघोरीला चाप – मत्स्य विभाग

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या...

पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक – खासदार नारायण राणे

चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे....

रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे बदलतेय रूपडे…

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे....
HomeRatnagiriपुन्हा एकदा राणे-राऊत लढाई...

पुन्हा एकदा राणे-राऊत लढाई…

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या राजकीय धुळवड रंगात आली आहे. 

तळकोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने २०१४ पासून राणे विरुद्ध राऊत अशी सुरू झालेली राजकीय लढाई सलग तिसऱ्या निवडणुकीत तशीच राहिली आहे. राजकीय लढाईतील प्रतिस्पर्धी तेच असले तरी राजकीय स्थित्यंतरे मात्र बदलली आहेत. विद्यमान खासदार विनायक राऊत यांना मागील दोन निवडणुकीत मिळालेली भाजप, मंत्री दीपक केसरकर आणि मंत्री उदय सामंत यांची ताकद यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना मिळाली आहे. काँग्रेसची गेल्या दोन निवडणुकीत राणे यांच्या बरोबर असलेली ताकद खासदार राऊत यांना मिळाली आहे. त्यामुळे या बदललेल्या राजकीय परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत राऊत विजयाची हॅट्ट्रिक साधतात की राणे त्याला ब्रेक लावून पराभवाची हॅ‌ट्ट्रिक खंडित करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीनिमित्त रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या राजकीय धुळवड रंगात आली आहे.

विकासाचे मुद्दे सोडून भावनिक मुद्दे आणि व्यक्तिगत विषय घेऊन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कोकणातील ही राजकीय लढाई गेली अनेक वर्षे राणे विरुद्ध शिवसेना अशी रंगत आली आहे. यावेळीही तीच स्थिती आहे. लोकसभेत राणे विरुद्ध राऊत अशी लढाई होत असली तरी यावेळी नीलेश राणे नसून त्यांचे वडील नारायण राणे रिंगणात आहेत. हा राणे यांच्या दृष्टीने मोठा बदल आहे. तर राऊत रिंगणात असलेतरी त्यांच्या सोबत यावेळी धनुष्यबाण चिन्ह नाही तुतारी आहे. हा राऊत यांच्या दृष्टीने मोठा बदल आहे. हेच बदल रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील विजयाचे खरे सूत्र ठरणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार ओळखीचे असले तरी दोन्ही उमेदवारांची चिन्हे नवखी आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांसमोर आपआपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान आहे. चेहरे जुने आणि चिन्ह नवीन अशी परिस्थिती या मतदारसंघात झाली असताना निवडणुकीतून धनुष्यबाण गायब झाल्याने मतदारसंघाचा इतिहास पाहता पारंपरिक धनुष्यबाण चिन्ह या निवडणुकीत दिसणार नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात २०१४ पासून राणे विरुद्ध राऊत अशी राजकीय लढाई सुरू झाली. त्याआधी २००९ ला नीलेश राणे खासदार झाले होते.

२०१४ ला पूर्ण देशात मोदी लाट होती. त्यावेळी सहा पैकी चार आमदार नीलेश राणे उभ्या असलेल्या महाविकास आघाडी सोबत होते. पण, यातील राष्ट्रवादीचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी राणे यांना उघड उघड विरोध केला होता. यावेळी दीड लाखाच्या मताधिक्याने राऊत विजयी झाले होते. २०१९ ची लोकसभा निवडणूक सुद्धा राऊत विरुद्ध राणे अशीच झाली. महायुतीच्या वतीने विद्यमान खासदार राऊत तर त्यांच्या विरुद्ध स्वाभिमान पक्षाच्या वतीने नीलेश राणे निवडणूक रिंगणात होते. यावेळी मात्र राऊत यांची ताकद वाढलेली होती. केवळ एकच आमदार राणेंच्या पाठीशी होता तर उर्वरित पाच आमदार राऊत यांच्या पाठीशी होते.

 २०१४ मध्ये मिळालेली काँग्रेसची ताकद सुद्धा त्यांना मिळाली नव्हती. काँग्रेसने येथून स्वतंत्र उमेदवार दिला होता. यावेळी नीलेश राणे यांचे वडील नारायण राणे भाजपचे राज्यसभा खासदार होते; परंतु भाजपची ताकद -त्यांना मिळू शकली नव्हती. एकाकी पडलेल्या राणे यांचा राऊत यांनी एक लाख ७८ हजार ३२२ मताधिक्याने पराभव केला. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा राणे विरुद्ध राऊत असे चित्र आहे; मात्र निवडणुकीत स्वतः नारायण राणे उमेदवार आहेत. माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, अनेक खात्यांचे मंत्री अशी पदे भूषविलेले श्री. राणे विद्यमान केंद्रीयमंत्री आहेत. त्यांच्याविरोधात हॅट्ट्रिक साधण्यासाठी श्री. राऊत उभे आहेत.

महायुतीच्या वतीने मागील दोन निवडणुका लढणारे राऊत यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने तर राणे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी घराणी तीच असलीतरी राजकीय स्थित्यंतरे मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहेत. २०१४ मध्ये ज्यांनी उघड विरोध करीत राणे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणारे तसेच २०१९ च्या निवडणुकीत उघडपणे राऊत यांच्यासोबत राहिलेले विद्यमान शिक्षणमंत्री केसरकर यावेळी राणे यांच्या सोबत आहेत. विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम सुद्धाराणे यांच्या सोबत आहेत. सध्याच्या परिस्थितीत सहा पैकी चार आमदार राणे यांच्या समवेत तर दोन आमदारांचे राऊत यांना पाठबळ आहे. या तुल्यबळ लढतीत सरसी कोणाची होणार, याची उत्कंठा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular