रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती १ लाख २८ हजार रुपयांनी तोट्यात गेली आहे. रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीला नफा प्राप्त होण्यासाठी लवकरच मच्छी वाहतूकीवर कर आकारण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश सावंत यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी विविध उपक्रम हाती घेण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकच कृषी उत्पन बाजार समिती आहे. या समितीचे सभापतीपद नुकतेच सुरेश सावंत यांनी स्वीकारले.
सध्या रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती तोट्यामध्ये आहे. गेल्या महिन्यात १ लाख २८ हजार रुपयांचा तोटा आला आहे. हा तोटा भरून रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती नफ्यामध्ये आणण्याकरीता विशेष मोहिम हाती घेण्याचा निर्णय सभापती सुरेश सावंत यांनी घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी करून त्याची वाहतूक केली जाते. नियमाप्रमाणे मच्छीवाहतुकीवर कर आकारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या निर्णयावर १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेत चर्चा होणार असल्याची माहिती सभापती सुरेश सावंत यांनी दिली.
नियमाप्रमाणेच मच्छीवाहतुकीवर कर आकारणीचा निर्णय घेण्यात येणार असून त्याकरीता मी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. मच्छिवाहतुकीवर कर आकारल्यानंतर त्यातून मच्छिमारांनाच सोयीसुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. मच्छिमार बंदरामध्ये बर्फ कारखाना, पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सुविधा तसेच डिझेल पंप उभारण्याकरीता आम्ही मदत करु असे सभापती सुरेश सावंत यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपक्रम सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्याच्या कार्यालयाच्या आवारात त्याठिकाणी बर्फ कारखाना उभारण्याचा आम्ही विचार करत असल्याचेही सावंत यांनी सांगितले.