गेल्या काही वर्षापासून शिक्षक भरती न झाल्याने जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची मोठ्या संख्येने पदे रिक्त राहिली आहेत. येत्या काही दिवसांमध्ये शिक्षक भरती होण्याची शक्यता असल्याने रिक्त असलेली शिक्षक पदे भरली जातील. मात्र, त्यापूर्वी विविध कारणांमुळे रखडलेली रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जिल्हाअंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी नुकतेच पवार यांना दिले. गेल्या काही वर्षापासून शासनाकडून शिक्षक भरती प्रक्रिया राबविलेली नाही.
त्याचवेळी वयोमानानुसार अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मोठ्यासंख्येने शिक्षकांची पदे रिक्त राहिली आहेत. याचा परिणाम मुलांच्या अध्यापनावर होवू लागल्याने पालकांमधून त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडून येत्या काही दिवसांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जाण्याचे संकेत दिले जात आहेत. त्याच्यातून शिक्षक भरती होवून रिक्त असलेल्या जागांवर नव्या शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. मात्र, त्यापूर्वी जिल्ह्यातर्गंत बदल्या न झाल्यास त्याचा फटका बदलीपात्र शिक्षकांना बसण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नवीन शिक्षक भरती होण्यापूर्वी रत्नागिरी- सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जिल्हाअंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी करीत यशवंतराव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे लक्ष वेधले आहे. २०१८ मध्ये झालेल्या शिक्षक बदल्यांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील हजारो शिक्षक दुर्गम भागामध्ये बदलीने गेले. त्यामधील अनेकांना आजही दुर्गम भागामध्ये सेवा बजावावी लागत आहे. तर, २०२२ मध्ये झालेल्या ऑनलाईन बदल्यांमध्ये दुर्गम भागातील शिक्षकांना रिक्त जागा दाखविल्या नाहीत त्यामुळे त्यांना बदली मागता आलेली नाही. २०२३ च्या बदल्यांमध्ये संवर्ग-३ मधील बदली अधिकारप्राप्त अनेक शिक्षकांना, बदलीची संधी मिळालेली नाही.