रत्नागिरी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने यंदा शहरातील वहाळ आणि गटारांची वेळेत साफसफाई सुरू केली आहे. पुढील पंधरा दिवसांत सर्व वहाळ आणि गटारांची स्वच्छता करण्याचे उद्दिष्ट्य निश्चित केले आहे. स्वच्छतेसाठी जेसीबी आणि २५ सफाई कामगारांचे पथक शहरात कार्यरत झाले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात वहाळ तुंबणे आणि गटारातील पाणी रस्त्यावर येण्याच्या घटनांवर रोख लागेल, अशी आशा नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी शहरात मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेली गटारे स्वच्छ केली गेली नाहीत तर दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्याला आळा घालण्यासाठी रत्नागिरी शहरातील तोरण नाल्यासह सहा प्रमुख वहाळांची स्वच्छता वेळेत करावी लागणार आहे. दरवर्षी पालिकेमार्फत पावसाळ्यापूर्वी या वहाळ आणि गटारांची स्वच्छतामोहीम हाती घेतली जाते. त्यानुसार आरोग्य विभागाचे अधिकारी अविनाश भोईर आणि स्वच्छता निरीक्षक सिद्धेश कांबळे यांनी गेल्या वर्षीप्रमाणेच स्वच्छतेचे नियोजन केले आहे.
आतापर्यंत शहरातील स्वच्छतेला सुरवात झाली असून, पुढील पंधरा दिवसांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. रत्नागिरी शहराच्या बाजारपेठेतील काही गटारे जुनी आणि अरूंद आहेत. त्या गटारांची पावसाळ्यापूर्वी वेळेत स्वच्छता झाली नाही, तर मुसळधार पावसावेळी गटाराचे पाणी रस्त्यावर येते. गटारांचे पाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी गेल्या वर्षीपासून वेळेत साफसफाई केली जात आहे. गोखलेनाका येथे अरूंद गटारामुळे पाणी तुंबते. त्यावर अजूनही मार्ग काढलेला नसल्यामुळे अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.