बिग बॉस -१५ ची विजेती आणि नागिन-६ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तिचा ‘मन कस्तुरी रे’ हा पहिला मराठी चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून तेजस्वीने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
तेजस्वीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे पोस्टर शेअर करत म्हटले की, चंचल मनाची प्रेमकथा, असे ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटाबद्दल म्हणता येईल. तेजस्वीसोबत या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे काम करत आहे. तेजस्वी प्रकाशने आतापर्यंत ‘संस्कार-धरोहर अपनों की’, ‘स्वरांगिनी- जोडे रिश्तों के सूर’, ‘पहरेदार पिया की’, ‘सिलसिला बदलते रिश्तों का’, ‘नागिन’ अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामुळे तिच्या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटाची विशेष उत्सुकता तिच्यासह तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.
तेजस्वी बिग बॉस १५ नंतर चर्चेत आली ती सह-स्पर्धक करण कुंद्राच्या प्रेमात पडल्यामुळे. त्यांनतर तेजस्वीचे दोन मराठी चित्रपट ‘मन कस्तुरी रे’ आणि ‘स्कूल, कॉलेज अन लाइफ’ हे चित्रपटगृहात रिलीज होण्यासाठी आधीच सज्ज आहेत. तथापि, अभिनेत्रीने निर्मात्यांना बिग बॉस १५ नंतर ते चित्रपट प्रदर्शित करण्याची विनंती केली होती. मन कस्तुरी रे चे दिग्दर्शक म्हणाले, “ती खूप चांगली खेळली आणि शोमध्ये नेहमी खरी राहिली. ती खूप बबली, जीवनाने परिपूर्ण आणि डाउन टू अर्थ आहे आणि तशीच बबली भूमिका या चित्रपटातील असल्याने तिची निवड करण्यात आली.
बिग बॉस मराठी ३ ची स्पर्धक आणि अभिनेत्री स्नेहा वाघने देखील इंस्टाग्रामवर तेजस्वी प्रकाशचे अभिनंदन केले आहे. तेजस्वीचा दुसरा मराठी चित्रपट शाळा, कॉलेज अनी लाइफ, रोहित शेट्टी निर्मित असणार आहे.