शोले सिनेमात फ्लॅशबॅक दाखवला आहे. गब्बरला गावातली लोक घाबरतात, तशीच स्थिती रत्नागिरीत आहे. जय व वीरू हे दोघे गावाला गब्बरपासून वाचवतात, आता एकट्यालाच काम करायचे आहे,’ असे सांगत भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. भाजपा बूथप्रम खानी पुढील ३ दिवसांत कार्यकर्त्यांशी ‘चर्चा करून ठरवावे की या विधानसभा निवडणुकीत काय करायचे आहे. ३ निवडणुकांत झालेला पराभव आणि २०१९ मध्ये घडलेल्या घटना आपण विसरलो नाहीये, ही सत्वपरीक्षा आहे, असे प्रतिपादन भाजपाचे रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख, माजी आमदार बाळ माने यांनी केले.
स्वयंवर मंगल कार्यालयात रत्नागिरी- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या ३५० बूथप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले की, जिल्ह्यात २०१९ मध्ये भाजपाला एकही जागा लढवण्यासाठी मिळाली नव्हती. आताच्या निवडणुकीत कमळाच्या निशाणीवर निवडणूक लढवायची आहे. त्याकरिता बूथ कमिट्या पूर्ण करून कार्यकत्यांनी घरोघरी संपर्क साधावा. वरिष्ठ नेते निर्णय घेतील. परंतु आपण सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. २०१९ प्रमाणे वागायचं का? बाळ माने बोलताना पुढे म्हणाले की, गेले २७ महिने महायुतीचे सरकार आहे, भाजप कार्यकर्त्यांची कामे होत आहेत, राज्य सरकारमध्ये आपल्या वाटा आहे, सत्तेची सर्व पदे मिळाली असून सासरी सून नांदते आहे.
परंतु लोकसभा निवडणुकीत आपल्याला किती मते मिळाली, याचा अभ्यास करा. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लवकरच जाहीर होणार आहे. आपण २०१९ प्रमाणेच वागायचं आहे की काय करायचं आहे, हे आपल्या कार्यकर्त्यांना विचारा. ३५२ बूथमधील प्रमुखांनी किमान २० घरांमध्ये भेटा व तीन दिवसांत निर्णय सांगा.
कोणाला हरवायचे हे फिक्स – कमळाच्या निशाणीवर आमदार व्हायला पाहिजे, ही समस्त पदाधिकाऱ्यांची भावना आहे. परंतु आज भाजपचा कार्यकर्ता संभ्रमित आहे. गेल्या निवडणुकांचा अभ्यास केला तर जनता कोणाला निवडून आणण्यासाठी विचार करत नाही तर ती पाडण्यासाठी जास्त विचार करते. त्यामुळे रत्नागिरीकरांनी कोणाला हरवायचं आहे, हे ठरवलेलं आहे, असे सूचक विधान बाळ माने यांनी केले.