गेली अनेक वर्षे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे निष्ठेने काम करणारे उदय बने यांनी निष्ठा म्हणजे काय असते याची जाणीव करून दिली आहे. उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला; मात्र आपल्यामुळे पक्षाला अडचण नको म्हणत उमेदवारी अर्ज मागे घेतला. ठाकरे सेनेच्या अधिकृत उमेदवाराला यामुळे बळ मिळाले. ठाकरे सेनेची ताकद आणखी वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सलग तीन निवडणुकांमध्ये भाजपच्या माने यांना पराभूत करून उदय सामंत यांनी या मतदारसंघावर आपले वर्चस्व निर्माण केले. यामागे शिवसेनेचे छुपे सहकार्य फायद्याचे ठरले; मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेंची साथ दिल्यामुळे या मतदारसंघामध्ये ठाकरे सेनेमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली. या वेळी निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी मिळावी, या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे इच्छुकांपैकी सर्व उमेदवार माघारी गेल्यानंतरही उदय बने हेच अखेरपर्यंत स्पर्धेमध्ये राहिले होते.
निष्ठावंत शिवसैनिक सामंत यांचा पराभव करू शकत नाही, हे ठाकरे यांच्याजवळ असलेल्या लोकांनी सांगितल्यामुळे आणि ठाकरे सेनेचे भास्कर जाधव यांचे सामंत यांच्याशी असलेले राजकीय वैर लक्षात घेता त्यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी आपले साडू भाजपचे बाळ माने यांना उतरवण्याचा निश्चय केला आणि त्यांना पक्षप्रवेश देऊन एबी फॉर्म दिला. निष्ठावान माणसालाच बाजूला केल्यामुळे प्रचंड नाराजी निर्माण झाली. त्यामुळे ठाकरे सेनेच्या मतांची विभागणी होईल, अशी भीती निर्माण झाली होती. अखेर या निष्ठावंत शिवसैनिकाने पक्षाचे हित लक्षात घेता अर्ज मागे घेतला. त्यामुळे ठाकरे सेनेचे प्राबल्य वाढण्याचे लक्षण या मतदारसंघात दिसून येत आहे.
भाजपचा उपयोग होईल – भाजपमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे माने यांच्या समर्थकांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला नसला तरी गेल्या अनेक वर्षांची पक्षातील मैत्री व संघटन याचा परिवर्तने करण्याच्यादृष्टीने भाजप कार्यकर्त्यांचा उपयोग होईल, या दृष्टिकोनातून मानेंची उमेदवारी निश्चित करण्यात आली. त्यामुळे माने यांच्याकडे ठाकरे सेनेचा समुदाय, भाजपमधील नाराज लोकांचा समुदाय आणि मुस्लिम समाजाचे बळ अशी ठाकरे सेनेची गणिते अवलंबून आहेत.