संगमेश्वर-साखरपा या राज्यमार्गावर सध्या वाहन चालवणे म्हणजे जिवाशी खेळ झाला आहे. गेले अनेक महिने या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे देवरूख येथे रास्तारोको करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रास्तारोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी सकाळी शिवसैनिकांनी देवरूख येथे गर्दी केली होती. शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना उपनेते माजी आमदार बाळ माने, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, राष्ट्रवादी शरद पवार पक्षनेते सुरेश बने, जिल्हा परिषद माजी सदस्य नेहा माने, प्रद्युम्न माने, अजित गवाणकर, जनतादलाचे युयुत्सू आर्ते आदी शिवसैनिक व विविध पक्षांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
संगमेश्वर-देवरूख राज्यमार्गावर प्रवास करणे अत्यंत धोक्याचे असताना त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही हालचाल केली जात नाही. या मार्गाच्या साईडपट्टीची खासगी टेलिफोन कंपनीने केबल टाकताना दुरवस्था केल्याने हा मार्ग अधिक धोकादायक बनला. बांधकाम विभागाने या मार्गाची तातडीने दुरुस्ती न केल्यास शिवसेना यापेक्षा आंदोलन उभे करेल, असा इशारा उपनेते बाळ माने यांनी दिला. या आंदोलनप्रसंगी शिवसेना नेते, शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते, शिवसैनिक, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे स्थानिक नेते कार्यकर्ते, काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.