रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी प्रचारादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले आहे. त्यामुळे या मतदार संघात खरी लढत राणे विरुद्ध ठाकरे अशी असल्याचे दिसते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीतर्फे रिंगणात असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मंगळवारी (ता. २३) चिपळूणमध्ये विविध ठिकाणी बैठका झाल्या. या दरम्यान त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. राणे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार विनायक राऊत निवडणूक लढवत असले तरी राणे उमेदवारापेक्षाही ठाकरेंना लक्ष्य करत आहेत.
नारायण राणेंचे राजकीय शत्रू भास्कर जाधव हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि नारायण राणे यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ते स्थानिक पातळीवर कुठेही सक्रिय नसले तरी पक्षाने ज्या ठिकाणी त्यांना प्रचारासाठी पाठवले आहे तेथून ते राणेंवर प्रहार सुरूच आहेत; मात्र नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांनाही बेदखल केल्याचे दिसते. निवडणुकीत कोणताही वाद नको म्हणून राणेंची प्रचारात शांत भूमिका असल्याचे दिसते. सभा आणि मेळाव्यात राणे विकासावर, मोदीच्या नेतृत्वावर बोलत आहेत.
मागील आठ वर्षांत झालेली विकासकामे आणि भारताची प्रगती या विषयांवर मतदारांना आणि कार्यकत्यांना मार्गदर्शन केले जात आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्याचा त्यांनी कशा पद्धतीने विकास करू, असे आवर्जून सांगत आहेत. महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांचे नाव न घेता स्थानिक खासदाराने मागील दहा वर्षात किती विकासकामे केली, असा प्रश्न ते विचारत आहेत. त्यामुळे रत्नागिरीत राणे विरुद्ध ठाकरे असाच सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे.